देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभागीय नियंत्रकांनी याची दखल घेवून बसफेरी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी एस. टी बस थांब्यावर येवून थांबले. मात्र दुसऱ्या दिवशीही बस न आल्याने कंटाळून विद्यार्थी घरी गेले.
येडगेवाडी ते कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदिरमधील अंतर हे १९ किलोमीटर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत चालत जाणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना घरचा रस्ता धरण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता.
जूनमध्ये शाळा सुरु झाली, तेव्हा येडगेवाडी विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाने चिपळूण-पाचांबे येडगेवाडी ही बसफेरी नियमित सुरु केली होती. मात्र मध्येच ब्रेक देत ही फेरी बंद करुन देवरुख आगारातून सुटणारी मिडीबस येडगेवाडीपर्यंत विस्तारीत केली.
या मिडीबसची वेळ बदलून द्यावी, अशी वारंवार विनंती करण्यात आली. वेळ न बदलता सुरु ठेवलेल्या मिडीबसकडे ही एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. अखेर त्या मिडीबसला घरघर लागल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले.
चिपळूण आगारातून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी चिपळूण - पाचांबे येडगेवाडी ही बस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. मात्र ती बंद करुन त्याऐवजी देवरुख आगाराची मिडीबस सुरु करण्यात आली होती. ही मिडीबस येडगेवाडीत सकाळी ७.३० वाजता पोहचून परत हायस्कूलला ८.३० वाजता जात होती.
शाळेची वेळ १०.३० वाजताची असल्याने विद्यार्थ्यांना नाहक दोन तास शाळेतच बसून रहावे लागत आहे. त्यातच विद्यार्थी नियमीत सकाळी ६ वाजता उठून उपाशीपोटी घर सोडत असल्याने दुपारी १.३० जेवणाच्या सुट्टीत जेवण करावे लागते. अल्पोहार वैगेरे न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत.