रत्नागिरी : कोविड साथरोगाचा संसर्ग वाढला असताना, कोकणवासीयांना दिलेला शब्द खरा करत, भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ कोटी ३५ लाख खर्च करून ४ कोविड केंद्रे उभारली आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा बुधवार ८ सप्टेंबरला होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.३० वाजता आमदार निधीचे पत्र वितरण आणि ऑनलाइन कार्यक्रम, तसेच परकार हॉस्पिटलमध्ये दुपारी १२.३० वाजता आरोग्य साधनसुविधा देण्याचा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन उपस्थित होते.
आमदार लाड म्हणाले की, भाजप आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारलेल्या या सुविधांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य सुविधा भक्कम होण्यास मदत होणार आहे. कोविडची तिसरी लाट येण्याची भीती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व्यक्त करत आहेत, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरीवासीयांना कोविडचा त्रास होऊ नये, त्रास झाल्यास या केंद्रांच्या माध्यमातून उपचार केले जातील.
कोविड केंद्रांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होईल. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार नीलेश राणे, माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार भाई गिरकर, आमदार नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत.
कोविडच्या पहिल्या लाटेत आमदार निधीतून आरोग्य सुविधा उभारण्यासंदर्भात लाड यांनी आवाहन केले होते. ग्रामीण भागांत आरोग्य सुविधा बळकट करण्याचे जाहीर केले होते. या आश्वासनांची पूर्तता या रुग्णालय आणि कोविड केंद्रांच्या माध्यमातून केली जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रे उभारली असल्याचे ॲड.पटवर्धन यांनी सांगितले.
अंत्योदय प्रतिष्ठानचा आर्थिक हातभार
आबासाहेब मराठे हायस्कूल हातीवले-राजापूर, खंडाळा हायस्कूल- रत्नागिरी, महात्मा गांधी विद्यालय, साखरपा आणि लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळे या ठिकाणी कोविड केअर सेंटर्स सुरू होणार आहेत. ही सेंटर्स भाजपचे आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, रमेश पाटील आणि प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून उभारली गेली आहेत. त्यांना नीता प्रसाद लाड यांच्या अंत्योदय प्रतिष्ठाननेही आर्थिक हातभार लावला आहे.