लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : भाजपामध्ये जायचे असते तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढा दिलाच नसता. एका मिनिटात भाजपामध्ये जाऊन आम्हा सर्वांची आमदारकी शाबूत राहिली असती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही आमची आमदारकी पणाला लावली. म्हणून आम्हीच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत, असे प्रतिपादन शिंदे सेनेचे प्रवक्ते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते.
"खरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. एकाच व्यक्तीची शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवलेल्यांची ही शिवसेना आहे. लोकशाहीमध्ये आपण एक विचार घेऊन पुढे जातो. त्या विचारालाच लोक मतदान करतात. लोकांनी सेना-भाजपा युतीला मतदान केले आहे. लोकांच्या मतांचा कोणी अनादर केला? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा लोकांनी पराभव केला त्यांना सत्तेवर कोणी बसवलं? हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामध्ये आम्ही मूळ शिवसेनेचा विचार कायम ठेवलेला आहे. दसरा मेळाव्याबाबतचा न्यायालयाचा निर्णयाशी काहीही राजकीय संबंध नाही. कोणी पहिला अर्ज दिला यावर हा निर्णय झालेला आहे", असे त्यांनी स्पष्ट केले.