देवरुख : काेल्हापूर येथून उपचार करून परतत असताना रुग्णवाहिकेला कंटेनरने धडक देऊन झालेल्या अपघातात संगमेश्वरजवळच्या कोंडअसुर्डे येथील दीर आणि भावजयचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान पन्हाळा-वाघबीळ येथे घडली. यशवंत दिनकर चव्हाण (वय ५८) आणि रश्मी राजेंद्र चव्हाण (४८) असे मृत्यू झालेल्या दाेघांची नावे असून, वैशाली श्रीकांत चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत.
यशवंत दिनकर चव्हाण ऊर्फ बावा चव्हाण हे आठवडाभर आजारी होते. त्यांच्यावर डेरवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा आजार वाढत गेल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. कोल्हापूर येथे उपचार झाल्यानंतर त्यांना परत संगमेश्वर येथे आणण्याचे ठरले. खासगी रुग्णवाहिकेने त्यांना संगमेश्वर येथे आणण्यात येत होते. रुग्णवाहिकेमध्ये यशवंत चव्हाण यांच्यासोबत वैशाली श्रीकांत चव्हाण, पांडुरंग रघुनाथ टाकले हे बसले होते. रुग्णवाहिकेने परतत असताना पन्हाळा वाघबीळ येथील वळणावर बुधवारी संध्याकाळी ५.३०वाजण्याच्या दरम्यान आले असता त्यांच्या रुग्णवाहिकेला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात यशवंत चव्हाण यांचा आणि रश्मी राजेंद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला.
यशवंत चव्हाण यांनी संगमेश्वरमध्ये अनेक वर्षे गाडीचा व्यवसाय केला. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा परिवार होता. तसेच त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमही होत असत. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या राहत्या घरी अनेकांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
चाैकट
कुटुंबीयांनीच पाहिला आपल्याच सदस्यांचा मृत्यू
ज्या रुग्णवाहिकेचा अपघात घडला त्याच्यापाठोपाठ त्यांचीच दुसरी गाडी येत होती. दहा मिनिटाच्या अंतराने येणाऱ्या गाडीने आपल्याच घरातील कुटुंबीयांच्या गाडीला अपघात झाल्याचे समजताच टाहो फोडला. असुर्डे येथील चव्हाण कुटुंबीयांच्या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याचे कळताच संगमेश्वर असुर्डे तसेच जवळच्या गावातील ग्रामस्थांनी पन्हाळा येथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मदतकार्य सुरू केले.