देवरूख : देवरूख नगरपंचायतीने थकीत पाणीपट्टीधारकांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला असून, थेट नळजोडणी तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत सहा नळधारकांच्या जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. नळपाणी योजना चालवण्यासाठी नगरपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमी पाणीपट्टीमध्ये मुबलक पाणीवाटप नगरपंचायतीकडून केले जात आहे. येणारे वीजबिल, योजनेचा होणारा दुरूस्ती खर्च, कर्मचारी वेतन याचा ताळमेळ मिळणाऱ्या पाणीपट्टीतून बसवणे जिकरीचे बनत आहे. यासाठी नगरपंचायतीने पाणीपट्टी वाढ किंवा नळांना मीटर बसवण्याचे पर्याय पुढे आणले. याला येथील नागरिकांनी विरोध दर्शवल्याने नगरपंचायतीचा नाईलाज झाला आहे. यासाठी किमान असलेली पाणीपट्टी ग्राहकांनी वेळेवर जमा केल्यास नगरपंचायतीला योजना चालविणे सोपे जाणार आहे. मात्र, किमान असलेली पाणीपट्टी भरण्यासही येथील नागरिक अल्प प्रतिसाद देत आहेत. नगरपंचायतीचे वसुली कर्मचारी नागरिकांच्या घरी वसुलीसाठी पोहोचत असताना देखील त्यांना सहकार्य केले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पाणीपट्टीची कमी वसुली होत आहे. आधीच ही नळपाणी योजना अडचणीत असून, त्यात वसुली कमी झाल्याने सदर योजना चालवताना नगरपंचायतीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपट्टी थकीत असणाऱ्या नळधारकांना सूचना देऊनही सहकार्य न करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गत पंधरा दिवसांमध्ये सहा जणांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. यापुढेही ही कारवाई सुरू ठेवली जाणार आहे. नळधारकांनी वेळेत पाणीपट्टी भरुन नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
देवरूखात नळजोडण्या तोडल्या
By admin | Published: April 24, 2016 12:42 AM