देवरुख : ‘सोळजाई माते की जय’च्या जयघोषात शहराची ग्रामदेवता श्री सोळजाई देवीचा लोटांगण व यात्रोत्सव मंगळवारी हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. रविवारी सकाळी ६ वाजता देवीचे पूजारी गुरव शेट्ये व असंख्य भक्तांच्या उपस्थितीत देवीचे पूजन झाले. यानंतर देवीला रुपे लावण्याचा कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात देवीसमोर स्थानिक भक्तगणांच्या भजनाचा कार्यक्रम रंगला. सायंकाळी ४ वाजता कारखानदार व कुमकर यांच्या हस्ते परंपरागत नवसाच्या लोटांगणाचा शुभारंभ करण्यात आला. यात देवीच्या कार्यक्षेत्रातील ७ भक्तांनी त्यांचे बोललेले नवस पूर्ण झाल्यामुळे देवीसमोर पाच लोटांगणे घातली. या कार्यक्रमानंतर नवीन नवस बोलणे, फेडणे असा कार्यक्रमही देवाळाच्या दीपस्तंभासमोर भक्तांना उभे करुन पार पडला. सायंकाळी देवीच्या चतु:सीमेतील भक्तगणांनी आणलेला नैवेद्य देवस्थानच्या चौकामध्ये देवीला दाखविण्यात आला. गुरवांच्या हस्ते मानकऱ्यांना प्रसाद वाटण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत लोटांगणे सुरू होताच मंदिर परिसरामध्ये दुपारी ३ वाजल्यापासून मोठी यात्रा भरली होती. या यात्रोत्सवाचा आनंद आलेल्या सर्व भाविकांनी लुटला. लोटांगण घालणाऱ्या भाविकांमध्ये लहान मुलांपासून वृध्द भाविकांचाही समावेश होता. लोटांगण सुरु असताना भाविकांनी धार्मिक अभंग व नृत्य करुन हा कार्यक्रम संपन्न केला. यात ढोल, ताशे, टाळ, मृदूंग व आरती घेऊन सुहासिनींचा ताफा दिसून आला. दिवसभर चतु:सीमेतील सुहासिनींनी देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
देवरुखात लोटांगण यात्रा उत्साहात
By admin | Published: November 23, 2014 10:08 PM