दापोली : लसीकरण सुरू हाेण्यास थाेडा विलंब झाल्याने लसीकरण केंद्रातील अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याचा पाणउतार केल्याचा प्रकार दापाेली शहरातील साेहनी विद्यामंदिर येथे घडला आहे़ या प्रकारामुळे काेराेनाच्या काळात कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़
‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचे मनोबल वाढविण्याऐवजी एखादी साधी चूक झाली म्हणून अधिकाऱ्यांकडून त्यांची झाडाझडती होत असेल तर कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होण्यास मदत होईल, असे याठिकाणी उपस्थित राहिलेल्या नागरिकांना बाेलून दाखविले़ कोराेना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत़; परंतु लसीकरणाला थोडासा विलंब झाल्याने केंद्रावर येऊन गोंधळ घातला जात आहे, तर काही ठिकाणी लसीकरण केंद्राबाहेर नागरिक वारंवार गर्दी करत आहेत. या परिस्थितीत लसीकरणाचे काम करणे कर्मचाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे़
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे केंद्र उपजिल्हा रुग्णालय बाहेर सोहनी विद्यामंदिरमध्ये हलविण्यात आले आहे़ याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यात आल्या आहेत़ मात्र, केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसमाेरच अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याची झाडाझडती घेतल्याने नाराजीचा सूर उमटत आहे़ केंद्रावर चक्क अधिकाऱ्याने गोंधळ घातल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे़