रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका प्रशासन आणि नळपाणी योजनेचा ठेकेदार कारणीभूत आहेत. संबंधितांच्या अक्षम्य बेपर्वाईतून नागरिकांना अकारण त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यावरील चिखल दूर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे देण्यात आले आहे.
याबाबत समविचारीच्या वतीने शहरातील नागरिकांना संबंधित निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुमारे ६३ नागरिकांनी यात सहभाग घेतला. यात असे नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण शहरात उन्हाळ्यात नळपाणी योजनेच्या निमित्ताने खोदाई झाली; पण वेळीच खड्डे बुजविले गेले नाहीत. तेव्हा दक्षता घेतली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती. त्या ठेकेदारावर निर्बंध वा देखरेखही झाली नाही. निव्वळ बेपर्वाईतून आबालवृद्धांना भर पावसात चिखलाच्या खाईतून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या निमित्ताने होणाऱ्या राजकीय उणीदुणीत जनतेसह आम्हाला त्यात स्वारस्य नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अस्तावस्त पसरलेल्या चिखलातून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने अनिर्बंध घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका विचारात घेऊन चिखल माती त्वरित साफ करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावे. जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये मुख्यत्वे आपल्या अधिपत्याखालील कार्यालय इथे असताना जिल्हा प्रशासनप्रमुखांच्या अखत्यारितच समोरासमोर हे असे घडावे, हे दुर्दैवी असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांच्या या कारणामुळे होणाऱ्या संभाव्य उद्रेकाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे समविचारीचे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये, संजू पुनसकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे, मंदार लेले, राजाराम गावडे, मयूर नाईक, प्रवीण नागवेकर, मनोहर गुरव आदींनी दिला आहे.