खेड: तालुक्यातील काडवली काजवेवाडी येथील क्रशरमध्ये वापरण्यासाठी बोअरब्लास्ट घेऊन खडीचे उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे वाडीतील घरांना हादरा बसत आहे. त्यामुळे सदर क्रशर तत्काळ बंद करावा व अवैध स्फोट घडवून घरांना नुकसान पोहोचवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. आठ दिवसात क्रशरवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यातील काडवली काजवेवाडी येथील क्रशरमध्ये वापरण्यासाठी बोअरब्लास्ट घेऊन खडीचे उत्खनन करण्यात येत आहे व त्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे. घरांच्या व गोठ्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. घरांची व गोठ्यांची कौले तुटलेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या खेड प्रांताधिकारी व तहसीलदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केलेला आहे.
ग्रामपंचायत काडवली ग्रामस्थांनी प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयाकडे या क्रशरबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामस्थांमध्ये या प्रकारामुळे प्रचंड नाराजी आहे. झालेल्या नुकसानापोटी तातडीने भरपाई द्यावी, तसेच परवानगी नसताना बोअरब्लास्ट करणाऱ्या क्रशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. याबाबत त्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुण चव्हाण, सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे यांनी पालकमंत्री अनिल परब, जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी खेड व तहसीलदार खेड यांच्याकडे निवेदनाव्दारे तक्रार केलेली आहे. आठ दिवसात कारवाई न झाल्यास जनआंदोलनास प्रशासनाने सामोरे जावे, असेही यावेळी काडवली पंचक्रोशीच्या ग्रामस्थांनी सांगितले.