दापोली : रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत खाडीपुलाची दुरुस्ती पूर्ण होऊनही अद्याप हा पूल बंदच ठेवण्यात आला आहे. सध्या जेटीद्वारे या पुलावरुन वाहतूक सुरु असून, पावसाळ्यात अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आंबेत खाडीपूल त्वरित सुरु करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
निबंध स्पर्धेला प्रतिसाद
चिपळूण : लायन्स क्लब, चिपळूण यांच्यावतीने ज्येष्ठांसाठी ‘पर्यावरणासाठी मी केलेले कार्य’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत कुलकर्णी आणि सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत मांडवकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
रोपांची विक्री
खेड : येथील एस. टी. स्टॅण्डसमोर वाणी पेठ, बाजारपेठ, नगरपालिका पाठीमागचे मैदान येथे मिरची, वांगी, माठाच्या पालेभाजीच्या रोपांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्रामीण भागातील महिला गावठी भाज्यांची रोपे आपापल्या परिसरात करुन विक्रीला आणत आहेत. सध्या या रोपांना मागणी वाढली आहे.
तोतापुरी आंब्याची आवक वाढली
रत्नागिरी : शहरात सध्या तोतापुरी, नीलम आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यावेळी अवेळी पडलेल्या पावसामुळे हापूसवर संक्रांत आल्याने नागरिकांना म्हणावा तेवढा आस्वाद घेता आला नाही. मात्र, सध्या सर्वसामान्य ग्राहक तोतापुरी आणि नीलम आंब्याकडे वळले आहेत.
स्वच्छतागृहे अस्वच्छ
दापोली : दाभोळ धक्क्यावर बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय झाली आहे. याठिकाणी स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी दाभोळ ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. मात्र, येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.