राजापूर : तालुक्यातील आंगले गावातील महावितरणचे जीर्ण झालेले ४५ खांब केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने महावितरणकडे हे खांब बदलण्याची मागणी करुनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
सन २०१९मध्ये आंगलेवासीयांनी गावातील ४८ खराब व जीर्ण झालेले विद्युत खांब बदलावेत, अशी आग्रही मागणी केली होती. त्यासाठी रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयात अर्ज केले होते. त्याचबरोबर मुंबईत जाऊन ऊर्जामंत्र्यांनाही दोनवेळा निवेदन देण्यात आले होते. उपविभागीय कार्यालय, राजापूर यांच्याकडेही अर्ज केले होते.
या मागणीनंतर तीन खांब बदलण्यात आले. मात्र, गावातील उर्वरित ४५ खांब अद्यापही बदलण्यात आलेले नाहीत. हे खांब केव्हाही पडतील, अशा स्थितीत आहेत. गावातील गंजलेले खांब त्वरित बदलावेत, अशी मागणी आंगले ग्रामस्थांनी केली आहे.