लोकमत आॅनलाईनखालगाव (जि. रत्नागिरी), दि. १७ : रत्नागिरी तालुक्यातील जयगड जिंदाल कंपनी ते कळझोंडी - फुणगूस - डिंगणी संगमेश्वरमार्गे नव्याने रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणार असून, या मार्गाचा कळझोंडी - सड्येवाडी येथील सुमारे ५० घरांना धोका संभवणार आहे. सुमारे ४०० लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणाहून जाणारा हा रेल्वेमार्ग या लोकवस्तीपासून दूर ५०० मीटर अंतरावरुन नेण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी कळझोंडी ग्रामपंचायतीत बोलवण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत केली आहे.
कळझोंडी ग्रामपंचायत येथे झालेल्या या विशेष ग्रामसभेला सरपंच सहदेव वीर, ग्रामविकास अधिकारी विनायक जाधव, रेल्वे अभियंता मंजुळनाथ पाटणकर, मंडल अधिकारी जाधव, पोलीसपाटील चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत निंबरे, काशिनाथ निंबरे, नम्रता पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अवधूत मुळ्ये, प्रकाश पवार यांच्यासह गावातील सुमारे १२५ ग्रामस्थ उपस्थित होते.
जयगड - कळझोंडी - चाफे - खालगाव - देऊड - मेढे - फुणगूस - डिंगणी - संगमेश्वर असा नवीन रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. मात्र, प्रशासनाने कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांना याची कल्पना न देता छुप्या पद्धतीने मार्गाचे सर्र्वेक्षण काम हाती घेतले आहे. याबाबतचे अंतिम सर्वेक्षण करण्यासाठी दिनांक १४ व १५ जून रोजी काही ग्रामस्थांना (शेतकऱ्यांना) थेट नोटीस पाठविण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली आहे.