लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : रिमझिम अन् धो-धो कोसळणाऱ्या पावसात भाजलेल्या मक्याच्या कणसांना लिंबू, तिखट, मीठ लावून खाण्याची मजा काहीशी निराळीच. पावसाळा सुरू झाल्याने अशा चटकदार कणसांना मागणी वाढली आहे. येथील बाजारपेठेसह रस्तोरस्ती या कणसांची विक्री होत आहे. कोरोनामुळे तालुक्यातील प्रसिद्ध धबधबे, पर्यटनस्थळे बंद असल्याने भाजक्या कणसांच्या विक्रीला फटका बसला आहे. त्यामुळे या परिसरातील छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
पावसाळा सुरू होताच शहरात मक्याची आवक वाढते. हिरवट-पिवळी सालं असलेले मक्याचे कणीस अनेकांचे लक्ष वेधून घेते. धो-धो कोसळणाऱ्या पावसात पर्यटनस्थळांबरोबरच घरामध्ये लिंबू, मीठ, तिखट लावून भाजलेलं कणीस खाणं हा अनेकांच्या आवडीचा कार्यक्रम असतो. चिपळूण तालुक्यातही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. बाजारपेठेसह ग्रामीण भागातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही त्यांची विक्री केली जात आहे.
पावसाळ्यात कोकणातील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी मुंबई, पुणेसह परजिल्ह्यातील असंख्य पर्यटक तालुक्यात येतात. मुंबई - गोवा महामार्गावरील पेढे येथील प्रसिद्ध सवतसडा धबधबा स्थानिकांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दाट धुक्यामुळे कुंभार्ली घाटातील विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते. याशिवाय अजूनही अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या पर्यटकांसाठीही भाजलेले कणीस आकर्षण ठरते. स्थानिक छोटे व्यावसायिक या कणीस विक्रीतून आपला संसार चालवतात. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गर्दी जमणारे धबधबे व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्याचा फटका कणीस विक्रीलाही बसला आहे. काही तरूण तसेच छोटे व्यावसायिक चिपळूण बाजारपेठेसह विविध ठिकाणी मक्याच्या कणसांची विक्री करत आहेत. कच्चे कणीस दहा रूपयाला एक तर भाजलेले कणीस वीस रूपयाला एक असे विकले जात आहे.
050721\img-20210705-wa0011.jpg
पावसाळ्यात 'चटकदार' मका कणीसांना मागणी वाढली आहे.