चिपळूण : शहरातील ५० हजार नागरिकांना मोफत घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण करण्याची मागणी शहर राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्याकडे याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुनही नागरिकांना वेळेवर लसीकरण होत नसल्याने गैरसोय झाल्याचे निदर्शनास आणले आहे.
परताव्याची मागणी
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ तसेच कोरोना व वातावरणातील बदलांमुळे यावर्षी मासेमारीसाठी कमी कालावधी मिळाला. मच्छिमारांना डिझेल परताव्यासाठी ४८ कोटींची प्रतीक्षा असून, काही महिन्यांपूर्वी आठ कोटी मिळाले होते. सध्या आर्थिक सहाय्याची गरज असल्याने मच्छिमारांना तातडीने परतावा मिळणे आवश्यक आहे.
भोसले यांची निवड
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबट जिल्हा परिषद गटविभाग अध्यक्षपदी प्रताप भोसले यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भोसले यांची निवड जाहीर केली असून, त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, उपतालुकाध्यक्ष अभिनव भुरण उपस्थित होते.
चारसुत्री लागवड प्रात्यक्षिक
चिपळूण : तालुक्यातील नागावे येथील दत्ताराम वीर यांच्या शेतात शेतकऱ्यांना चारसुत्री भातलागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अधिक भात उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी चारसुत्री पद्धतीचा अवलंब करुन अधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन यावेळी कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले.
सुरुची लागवड
रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे वायंगणी येथील समुद्रकिनारी १०० सुरुची रोपे लावण्यात आली. यावेळी मंडळाचे प्रमुख व गोळप ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश काळे यांनी सुरु लागवडीतून किनाऱ्याची धूप थांबविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
लातूर बससेवा सुरु
खेड : येथील बसस्थानकातून चिपळूण, लातूर मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांकडूनही या बस सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. सकाळी ९ वाजता खेड बसस्थानकातून लातूर बस सुटणार आहे तर लातूर बसस्थानकातून सकाळी ९.१५ वाजता खेडकडे निघणार आहे.
कोरोना केंद्र सुरु
दापोली : तालुक्यातील केळशी येथील महावीर भवनात सुरु केलेल्या कोरोना केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. पंचक्रोशीतील प्रशस्त अशी जैन समाजाची इमारत कोरोना रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बन्सीलाल जैन यांच्या हस्ते या कोरोना केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
अक्कलकोट बसफेरी सुरु
चिपळूण : प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण आगारातून अक्कलकोट बसफेरी सुरु करण्यात आली आहे. सकाळी ७.३० वाजता व रात्री ९.३० वाजता आगारातून ही फेरी रवाना होणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिपळूण आगारातर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचा निकाल जाहीर
खेड : तालुक्यातील अपेडे येथील कदम फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेमध्ये ३६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सात वर्षांपर्यंतच्या गटात यती खेडेकर हिने यश मिळवले आहे.
आंबे मुबलक
रत्नागिरी : परजिल्ह्यातील आंबे मुबलक स्वरुपात विक्रीसाठी आले आहेत. लंगडा, केशर, दशहरी, बलसाड, नीलम आदी विविध प्रकारचे आंबे सध्या शहरात उपलब्ध असून, ६० ते १५० रुपये किलो दराने त्यांची विक्री सुरु आहे. शहरातील नाक्यानाक्यावर सुरू असलेल्या आंबा विक्रीला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.