रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोकण विभाग स्तरावर होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. ४ एप्रिल रोजीच्या आदेशान्वये राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यादृष्टीने लोकशाही दिनही रद्द करण्यात आला.
मास्क वाटप
गुहागर : येथील मनसेच्या तालुका शाखेच्यावतीने जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मास्कचे वाटप करण्यात आले. मनसेचे अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यावतीने हे मास्क देण्यात आले. यावेळी विनोद जानवळकर, अनिल कोंडविलकर, दिनेश निवाते, संकेत कोंडविलकर, सिद्धेश निवाते उपस्थित होते.
आंबेडकर जयंती रद्द
आवाशी : यावर्षी पुन्हा कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२० वा जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. खेड तालुका बौद्ध समाज संघाने जयंती घरगुती स्वरूपात साजरी करावी, असे आवाहन केले आहे.
भैरवगडावरील यात्रा रद्द
देवरुख : सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात सोमवारी आयोजित करण्यात आलेली वार्षिक यात्रा रद्द केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर देवस्थानच्यावतीने घेण्यात आला.
रक्तदान शिबिर
देवरुख : पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे सोमवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शहरातील माटे भोजने सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून हे शिबिर सुरू झाले. या शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.
मळभाचे वातावरण
रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात पुन्हा मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागला आहे. मळभाचे वातावरण अधुनमधून मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. या बदलत्या वातावरणामुळे पित्त, सर्दी-पडसे आदीचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
बाजारपेठेत गर्दी
साखरपा : दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन संपताच बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. दोन दिवस पूर्णपणे बाजारपेठ बंद राहिल्याने नागरिकांना विविध वस्तूंची खरेदी करता आली नव्हती. मात्र सोमवारी बाजारपेठ सुरू होताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत खरेदीसाठी हजेरी लावली.
पोलीस मित्रांचा सत्कार
दापोली : तालुक्यातील दाभोळ येथील १३ पोलीस मित्रांचा सत्कार कोरोना योद्धा पुरस्काराने रत्नागिरीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आला. कोविड काळात हे पोलीसमित्र अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत होते. कोरोना काळातील या कार्याबद्दल या १३ पोलीस मित्रांचा सत्कार केला.
लसीची प्रतीक्षा
रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणची लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा लस घेणाऱ्या नागरिकांकडून, लस कधी येणार याविषयी प्रतीक्षा केली जात आहे. काही आस्थापना, कार्यालये येथील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
कांद्याचे दर घसरले
रत्नागिरी : कांद्याचे दर १५ ते २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परजिल्ह्यातील अनेक कांदाविक्रेते शहरात तसेच जिल्ह्यातील इतर भागामध्ये कांदे विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सुमारे १५० रुपयांपर्यंत गेलेला कांद्याचा दर आता १५ ते २५ रुपये किलोपर्यंत आला आहे. त्यामुळे कांदा खरेदीसाठी गर्दी होत आहे.