शिवाजी गाेरे
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील सी कॉच रिसॉर्ट तोडल्यानंतर आता साई रिसॉर्ट समोरील शासकीय जागेत अतिक्रमण केलेले बांधकाम तोडण्यास आज, शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. दापोली तहसीलदारांनी नोटीस बजावल्यानंतर हे काम संबंधित मालक स्वतःहून करत असल्याची माहिती पुढे आली आहे.साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अजूनही या रिसॉर्टच्या पाडकामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. पण याच रिसॉर्टसमोरील शासकीय जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दापोली तहसीलदारांनी संबंधित मालकांना नोटीस बजावल्यानंतर ते बांधकाम तोडण्याचे काम संबंधित मालकाने स्वतःहून सुरू केले आहे.सुनावणी ९ जानेवारीपर्यंत तहकूबदापोली कनिष्ठ न्यायालयाने साई रिसॉर्टचे बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर रिसॉर्टबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांनी उच्च न्यायालयात केला. तसेच ‘जैसे थे’ स्थितीचा आदेश मागे घेण्याची मागणी करीत त्याच कनिष्ठ न्यायालयात अर्जही दाखल केल्याची माहिती न्यायालयात दिली. याची नोंद घेत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी थेट ९ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली आहे.