चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता. परंतु दुसऱ्या लेन वरील खडक तोडण्यासाठी बराच दिवस गेल्याने दुरुस्तीचे लांबणीवर पडले होते. मात्र खचलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एकीकडे दरडीची भीती, तर दुसरीकडे खचलेल्या रस्त्याचा धोका निर्माण झाला होता. आता खचलेले काँक्रीटीकरण ब्रेकरने तोडले जात आहे. त्याठिकाणी लवकरच नव्याने काँक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा वाढल्याने या ठिकाणच्या कामातील गुंता वाढत गेला. परीणामी परशुराम घाटातील काम अनेक महिने स्थगित ठेवण्यात आले होते. प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता. या घाटातील अतिशय अवघड काम चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. कल्याण टोलवेज कंपनी मार्फत हे काम केले जात आहे. मात्र या कंपनीमार्फत दरडीच्या बाजूने केलेले काँक्रीटीकर पहिल्याच पावसात खचले होते. गत वर्षी परशुराम घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसळली होती. मात्र मोठ्या वळणावर रस्ता खचला असून तेथून जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक सुरु आहे. याच दरम्यान पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पायथ्यालगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच तेथील सहा घरांना फटका बसला. मात्र अजूनही हा धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूस मोठी वस्ती असून या घरांसाठी दिवसेंदिवस धोका अजूनही तळलेला नाही. त्यामुळे नव्याने करण्यात येणारे काँक्रीटीकरण मजबुत करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
परशुराम घाटातील खचलेले काँक्रीटीकरण तोडण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 6:02 PM