दापोली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तालुक्यातील जालगाव कोविड सेंटर येथील विलगीकरण कक्षात योग प्रशिक्षक हर्षदा डोंगरे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसे पाहिले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
दापोली तालुक्यातील जालगाव येथील कोविड सेंटर, विलगीकरण कक्षातील बाधितांना शरीरातील ऑक्सिजन लेव्हल व रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याकरिता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक हर्षदा डोंगरे यांनी खास प्राणायामचे प्रशिक्षण दिले. शरीराच्या निरोगी स्थितीला कायम ठेवण्यासाठी योगच एकमात्र सशक्त साधन आहे आणि त्याला जोड आहे आयुर्वेदाची. असे सांगतानाच योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांच्या अनुयायी हर्षदा डोंगरे यांनी जालगाव कोविड सेंटर येथील विलगीकरण कक्षामध्ये बाधितांना योग दिनानिमित्त खास प्राणायामचे प्रशिक्षण दिले, तसेच बाधितांकडून सूक्ष्म व्यायाम करवून घेतले. कोरोना काळात ते पिसाई आरोग्य केंद्रातील कोविड सेंटर, जालगाव कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांना कोरोनाचे धडे देत आहेत़ जालगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापूलिंग आवळे, सरपंच रोशनी गोलांबडे व सर्व सदस्यांचे चांगले सहकार्य लाभत आहे़
------------------------
जालगाव येथील विलगीकरण कक्षात योग प्रशिक्षिका हर्षदा डोंगरे यांनी याेगाची प्रात्यक्षिक करून दाखविली़