देवरूख : नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केल्यामुळे देवरूखच्या सभागृहात अर्ज भरण्याच्या ठिकाणी उमेदवार व निवडणूक विभागाचे अधिकारी अविशकुमार सोनाने यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निडणूक निर्णय अधिकारी सोनाने यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, आपण निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूक अर्ज दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना सभागृहात देण्यात आल्या आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार, त्यांचे सहकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात याच मुद्द्यावरून बराच वेळ चर्चा झाली. यातून काही निष्पन्न होत नसल्यामुळे संभ्रमावस्था खूप वेळ ताणली गेली.
अखेर पत्रकारांनी पुढाकार घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सोनाने यांना तांत्रिक मुद्द्याबद्दल विचारणा केली. यावर सोनाने यांनी निवडणूक विभागाचे आदेश सांगितले. आपण त्याचे पालन करीत आहोत.
नगराध्यक्षपदाच्या काही उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र ३ वाजेपर्यंत जोडलेले नाही, यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवले असून, हे प्रमाणपत्र जोडण्यासाठी छाननी दिनी मुदत मिळते का? हे या मार्गदर्शनातून स्पष्ट होणार आहे. मात्र, ज्यांनी सोमवारी जातवैधता प्रमाणपत्र जोडलेले नाही, अशा उमेदवारांची रात्र चिंताक्रांत अवस्थेत जाणार आहे.अंतिम दिवसापर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिवसेनेकडून १७ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान भाजपमध्ये काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या अनघा कांगणे यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.नगराध्यक्षपद उमेदवारनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडीकडून स्मिता लाड, स्वाभिमान पक्षाकडून मिताली तळेकर, भाजप युतीकडून मृणाल शेट्ये व अपक्ष म्हणून अनघा कांगणे यांनी अर्ज दाखल केले. देवरूख नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकूण पाच अर्ज दाखल करण्यात आले आहेत.उमेदवारांत संभ्रमावस्थाअर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी अविशकुमार सोनाने यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र अर्ज भरण्याच्या मुदतीत जोडण्यात यावेत, असे जाहीर केले. आयत्या वेळी हा निर्णय जाहीर केल्याने सर्वच उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे.