देवरूख : देवरूखहून रत्नागिरीला जाणारी एस. टी. बस एका बाजूला गटारात कलंडल्याची घटना तुळसणी येथे रविवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. ओव्हरटेक करीत असताना भरावामध्ये रूतून कलंडलेली ही बस सुदैवाने झाडावर कलंडल्याने मोठी दुर्घटना टळली.केबल टाकण्याकरिता करण्यात आलेल्या खोदाईमुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याची एकच प्रतिक्रिया तालुकाभरातून उमटत आहे. याच दरम्यान एक बोलेरो गाडीदेखील गटारात रूतल्याची घटना घडली आहे. देवरूखहून रत्नागिरीकडे जाणारी एस. टी. बस (एमएच १४ बीटी २९७९) ही बस ओव्हरटेक करताना उजव्या बाजुला जाऊन खोदाई केलेल्या गटारामध्ये रूतून कलंडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही बस कलंडून आंब्याच्या झाडावर टेकल्याने दुर्घटना टळली आहे.
ही घटना तुळसणी नागझरी दरम्यान दुपारी सव्वा दोन वाजता घडली. यानंतर अर्ध्या तासाच्या फरकाने रत्नागिरीहून देवरूखकडे येणारी बोलेरो गाडी अशीच रस्त्याच्या कडेला रूतल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी जिओ कंपनीने केबल टाकण्याकरिता केलेली खोदाई अनेकांची डोकेदुखी बनली आहे.
वाहनचालक नवीन असेल आणि त्याला जर त्याचा अंदाज आला नाही तर अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर एका खासगी मोबाईल कंपनीची केबल टाकण्याकरिता खोदाई करण्याची परवानगी कशी काय दिली? असा सवाल होत आहे.