लाेक उपाेषणाला बसलेत, तुम्ही करताय काय?, चिपळूण बचाव समितीच्या उपोषणाची अजित पवारांनी घेतली गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 11:50 AM2021-12-10T11:50:04+5:302021-12-10T11:51:28+5:30
चिपळूणमधील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाला साडेसात कोटी रुपये द्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिव कपोले यांना दिले.
चिपळूण : आमदार राजीनामा द्यायला निघालेत, लोक उपोषणाला बसलेत, तुम्ही करताय काय, असे सांगत तातडीने चिपळूणमधील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाला साडेसात कोटी रुपये द्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिव कपोले यांना दिले.
वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाळ काढण्यासाठी साडेसात कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निधीस मंजुरी देण्याची हमी दिली आहे. त्यामुळे या कामाला गती येण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला.
चिपळूण बचाव समितीच्या साखळी उपोषणाला आमदार शेखर निकम यांनी पहिल्या दिवशी भेट देत पाठिंबा दिला होता, तर दुसऱ्याच दिवशी ते मुंबईत पोहोचले. जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार निकम यांनी भेट घेतली. गाळ उपसण्याच्या या सर्व कामासाठी लागणाऱ्या सर्व मशिन व यंत्रणेसाठी लागणाऱ्या इंधनाकरिता निधी उपलब्ध होत नाही. या मागणीसाठी लोकांचा आक्रोश वाढत आहे. वारंवार पत्रव्यवहार केला, गाळ काढण्याचे प्रस्ताव पाठवले तरी त्यास मंजुरी मिळत नाही. आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी आमदार शेखर निकम यांना बोलावून घेतले. येत्या हिवाळी अधिवेशनात गाळ काढण्यासाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. तातडीने गाळ काढण्यास सुरूवात करा, अशी सूचना केली. यावेळी जलसंपदा विभागाचे अभियंता तथा सचिव कपोले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पुरवणी यादीमध्ये यांत्रिकी विभागास डिझेलसाठी ७ कोटी ३० लाखाची तरतूद करतो, तुम्ही काम सुरू करा, असेही पवारांनी निर्देश दिले. निधी मंजुरीबाबत तोंडी आश्वासन मिळाले आहे. यांत्रिकी विभागास गाळ काढण्याचे काम सुरू करण्यासाठीचे लेखी आदेश देण्याची प्रक्रिया गुरुवारी मंत्रालयात सुरू होती.