मेहरून नाकाडेरत्नागिरी : रिझवानाने महत्प्रयासाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत जिल्ह्यातून प्रथम महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. ध्येयवेड्या रिझवानाला आता राज्य सेवा आयोगाची पुढील परीक्षा पास होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) व्हायचे आहे.
उंच स्वप्न बाळगल्यानेच उंच भरारी निश्चितच घेता येते. परंतु त्यासाठीही अविरत कष्ट, चिकाटी, आत्मविश्वास याची गरज आहे. परिस्थिती बेताची असतानाही रिझवानाने जिद्दीने प्रवास केला. मॅरेथॉन, क्रॉसकंट्री, अॅथलेटिक्स स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरावर यश संपादन करणाऱ्या रिझवानाने रत्नागिरी शहराचे नाव उंचावले आहे. गोदुताई जांभेकर विद्यालयात रिझवानाने शालेय शिक्षण पूर्ण केले. गोगटे कॉलेजमध्ये पदवी घेतल्यानंतर ती विधी परीक्षा उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा देण्याचे ठरविले.
दोन ते तीन वेळा दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु तिने चिकाटी सोडली नाही. तिला शिक्षण विस्तार अधिकारी एस. जे. मुरकुटे यांचे मार्गदर्शन लाभले.रिझवानाची कौटुंबिक स्थिती बेताची आहे. आई-वडील दोघेही मजुरीचे काम करीत असतानाच एमआयडीसी येथे जागा घेऊन छोटा व्यवसाय सुरू केला. लेकीची जिद्द पाहून वडिलांनी तिला पाठिंबा दिला. तिच्यासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली. कसलाही कंटाळा न करता, तिने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आणि यशही मिळविले. उपनिरीक्षक झालेल्या रिझवानाला आता नाशिक येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.बक्षिसाची रक्कमबक्षिसाच्या मिळणाऱ्या रकमेचा विनियोग तिने स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, प्रवासखर्चासाठी केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळालेली सर्व रक्कम तिने आजीच्या आजारपणासाठी खर्च केली.