रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवपुतळ्याजवळील शिवसृष्टीत उभारलेल्या मावळ्यांची विटंबना केल्याची घटना सोमवारी सकाळी निदर्शनाला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी संदेश गावडे (वय २४ वर्षे) या रत्नागिरी शहरातील तरुणाला ताब्यात घेतले आहे.रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ असलेल्या शिवसृष्टीतील काही मावळ्यांची विटंबना करण्यात आली. शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या हे निदर्शनात येताच त्यांनी तिथे असलेल्या संदेश गावडे याला हटकले. मात्र, तो मारूती मंदिर येथून एस. टी. स्टॅण्डच्या दिशेने पळाला. अखेर पोलिसांनी त्याला आठवडा बाजार येथे ताब्यात घेतले.त्याच्याविरूद्ध रत्नागिरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चाैकशीत गावडे हा रत्नागिरीतील रहिवासी असल्याचे पुढे आले असून, त्याची अधिक चाैकशी सुरू आहे. पुढील कार्यवाहीसाठी गावडे याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, हे वृत्त सर्वत्र पसरताच या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध सुरू झाला. रत्नागिरी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, विजय खेडेकर, अभिजित दुडे, प्रशांत सुर्वे, दीपक पवार यांनी शहर पोलिस स्थानकात निवेदन दिले आहे. त्यानुसार सखोल चाैकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे