रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका उद्भवणाऱ्या चांदेराई येथे नदीतील गाळ उपशाचे काम वेगात सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमधून त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून, पाटबंधारे खात्याकडून हे काम केले जात आहे. मात्र उपसलेला गाळ नदीकिनारीच ठेवला जात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदीत येण्याची भीती आहे.चांदेराईमधून वाहणाऱ्या काजळी नदीला दरवर्षी पूर येतो. सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. वर्षानुवर्षे या नदीतील गाळ काढण्यात आला नसल्याने अतिवृष्टी काळात नदीचे पात्र रुंदावते. दरवर्षी पुरामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान होते. यावर पर्याय काढण्यासाठी म्हणून गतवर्षापासून नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गतवर्षी साधनसामग्री कमी असल्याने या कामात फारशी प्रगती झाली नाही.यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पाटबंधारे खात्याने गतवर्षीपेक्षा थोडी अधिक यंत्रणा उपलब्ध केली असल्याने या कामाला गती आली आहे. मात्र उपसलेला गाळ नदीच्या काठावरच ठेवला जात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदी येऊन समस्या तशीच राहण्याचीही भीती आहे.
Ratnagiri news: पूरमुक्ततेसाठी चांदेराईत नदीतील गाळउपसा सुरू, मात्र..
By मनोज मुळ्ये | Published: March 17, 2023 1:59 PM