आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १५ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम चालू झाल्यापासून वाहतूक रिबेटच्या फरकाची रक्कम मिळावी, यासह इतर मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत निराशाच झाल्याने संघटनेने आपल्या १ आॅगस्टपासून धान्यउचल न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.दि. २३ फेब्रुवारी २०१२च्या शासन निर्णयानुसार तालुका गोदामापासून धान्य दुकानापर्यंत सर्व धान्य पोहोच करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया अपूर्ण असल्याने गेली तीन वर्षे दुकानदार स्वत:च ही वाहतूक करीत आहेत. फेब्रुवारी २०१४ ते जुलै २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील ९३५ दुकानदारांनी अंदाजे १३,८३,७४,४०० एवढी रक्कम स्वत:कडील वापरली आहे. चालू अधिवेशनामध्ये या रकमेला मंजुरी घेऊन तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेने १ आॅगस्टपासून धान्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले व त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.यावेळी चव्हाण यांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले. दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या पॉस मशीनचे काम करा, असे आवाहन त्यांनी संघटनेला केले. मात्र, यातून संघटनेला दिलासा मिळाला नसल्याने संघटनेने सध्या तरी आपला निर्णय कायम ठेवला आहे.
मंत्र्यांकडून निराशा; धान्य दुकानदार ठाम
By admin | Published: July 15, 2017 2:34 PM