रत्नागिरी : राज्यातील सर्वच प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. भाविकांना देवाचे दर्शन घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे, तब्बल दीड वर्षांनी गणपतीपुळेतील श्री मंदिरात अंगारकी साजरी होत आहे. मात्र, अद्यापही भाविकांना कोरोना नियमावलीचे बंधन घालून देण्यात आले आहे. त्यामुळे, गणपतीमुळेच्या मंदिरातही गर्दीचे प्रमाण खूप कमीच असल्याचे दिसत आहे. त्यातच समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आल्याने समुद्रकिनाराही ओस पडला आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भाविक गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन प्रत्येक भाविकांना दर्शन दिले जात आहे. मात्र, दीड वर्षांनी अंगारकीसाठी मंदिरात जाण्याची संधी असली तरी भाविकांची संख्या तुलनेने कमीच आहे. अद्याप काहीच लोकांनी पर्यटनस्थळी भेट देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच, पर्यटकांची गर्दी पर्यनटस्थळावर किंवा देवस्थानच्या ठिकाणी दिसून येत नाही. पावसाळा संपल्यामुळे आणि कोरोना नियमावलींमध्ये शिथिलता मिळाल्याने पुढील महिन्यात पर्यटनस्थळ बहरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.