रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींनी निधी दिल्यानंतर पाठ फिरवल्याने शासनाचे तब्बल १४ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. राजापूर-जैतापूरदरम्यान रखडलेला कॉजवे झाला. मात्र, खाडीत येणाऱ्या भरती ओहोटीचा विचारच न केल्याने भरती आली की भर पावसाळ्याप्रमाणे कॉजवेवर दीड फूट पाणी चढते. त्यामुळे कॉजवे होऊनही भरती आणि ओहोटीची वेळ पाहूनच त्याचा वापर करावा लागत आहे.राजापूर - जैतापूरदरम्यान असलेल्या वहाळावरील कॉजवे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. देसाई वहाळावर जिल्हा परिषदेने बांधलेला लोखंडी साकव अत्यंत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याने दळेचे माजी सरपंच विजय गोरिवले यांनी शासनाच्या पश्चिम घाट योजनेतून येथे छोट्या पुलाचे काम मंजूर करून घेतले होते. या पुलाची निविदा प्रक्रिया होऊन धनंजय चव्हाण नामक ठेकेदाराला कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, शासनाने अचानक योजना गुंडाळल्याने हे काम होऊ शकले नाही. त्यानंतर विजय गोरिवले यांनी आमदार राजन साळवी यांना विनंती केली. आमदार साळवी यांनी सन २०१४/१५च्या जिल्हा वार्षिक योजनेतून साकव कार्यक्रमात या कॉजवेला मंजुरी मिळवली होती. हे काम होण्याबाबत ‘लोकमत’नेही वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कॉजवेचे कामही सुरू झाले. मात्र, ठेकेदाराने खाडीच्या भरती ओहोटीचा विचारच केला नाही. त्यामुुळे या कामावरील पैसा पाण्यातच गेला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याने तसेच ज्यांनी या कामासाठी निधी दिला, त्या आमदार राजन साळवी यांनी या कामाकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ निधी देऊन पाठ फिरवली. त्यामुळे आता एवढा पैसा खर्च करूनही प्रश्न कायम आहे.१४.१२ लाख खर्चाला प्रशासकीय मान्यता असलेल्या कामाचे १२ लाख ११ हजार ८४२ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खाडीच्या भरतीचं पाणी सुमारे दीड फूट कॉजवेवर येत असल्याने कॉजवे असूनही वाहतूक आणि रहदारी भरती ओहोटीची वेळ पाहूनच करावी लागते. कारण भरतीच्या वेळी हा कॉजवे सुमारे दीड फूट पाण्याखाली जातो. त्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटतोच शिवाय या मार्गावरील वाहतूकही भरती संपेपर्यंत खोळंबून राहाते. या कॉजवेवरून जाण्या-येण्यासाठी भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहावे लागते. अशा कॉजवेवरून जाण्यापेक्षा जलप्रवास बरा, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून उमटत आहेत.अतिवृष्टीत वहाळाचं पाणी साकवावरून जाणं हे ठीक आहे. मात्र खाडीच्या नियमित भरती ओहोटीचं पाणीदेखील या साकवावरून जावं, याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.यावर कॉजवेची उंची वाढवणे हा एकच पर्याय आहे. बांधकाम जनतेसाठी होत असल्याने त्याचा उपयोग जनतेसाठी व्हायला हवा आणि एवढा पैसा ओतूनही समस्या तशीच राहात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल आता ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. जनतेसाठी कामे करावी लागतात. त्यावेळी त्याच्यासाठीचे नियम आणि निकषांचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल विजय गोरिवले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
कॉजवे होऊनही प्रश्न ‘जैसे थे’च
By admin | Published: March 02, 2015 11:02 PM