रत्नागिरी : पावसाळा सुरू झाला, तरी टंचाई आराखड्यातील १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपयांची नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीची कामे अजूनही कागदावरच आहेत. कोरोनाचा परिणाम या योजना दुरुस्तीच्या कामावर होते. या विकासकामांची अजूनही ठेकेदारांना ऑर्डर दिलेली नाही. त्यामुळे ही कामे कधी सुरू होणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
यंदा जिल्ह्यात ६४ गावांतील १०६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. या टंचाईग्रस्तांना १३ टॅंकटरनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तोही अपुरा असल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू होते, परंतु यंदा वादळांमुळे पाऊस पडल्याने जिल्ह्याला पाणी टंचाईचे संकट कमी प्रमाणात भेडसावले. त्यामुळे टँकरवरील खर्च कमी झालेला आहे. यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा होता. त्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्तीवर १२ कोटी ७८ लाख ५५ हजार खर्च करण्याचे नमूद करण्यात आले आहे. २४९ नळपाणी योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे भीषण पाणीटंचाई उद्भवते. यंदा कोरोनाच्या संकटात पाणीटंचाईची भीषणता कमी होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. एप्रिल आणि मे, २०२१ मध्ये जिल्ह्यात कोरोचा प्रादुर्भाव असल्याने नळपाणी योजना दुरुस्तीची कामे अजूनही निविदा स्तरावर असल्याने ही कामे रखडलेली आहेत.
--------------------------
पाणीटंचाई कृती आराखडा उशिरा
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम सर्वच विकास कामांवर झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर विभागांच्याही विकासकामांवर परिणाम झाल्याने ती सुरू होऊ शकलेली नाहीत. त्याप्रमाणेच या वर्षी तालुक्यातून टंचाईकृती आराखडे उशिरा सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडूनही हा आराखडा जिल्हा प्रशासनाकडे वेळेवर सादर होऊ शकला नाही. त्यातच मंजुरी मिळूनही आराखड्यातील कामे सुरू झालेली नसल्याने, टंचाईमध्ये लाेकांचे हाल झाले आहेत.
-----------------------
पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर - रुपये १६ कोटी ४३ लाख ३४ हजार
पाणी योजना दुरुस्ती खर्च - रुपये १२ कोटी ७८ लाख ५५ हजार
दुरुस्तीसाठी नळपाणीपुरवठा योजना- २४९
------------------------------
तालुका पाणी योजना खर्च (लाखांत)
मंडणगड १५ ९९.००
दापोली ४० १५३.००
खेड २४ १६०.००
चिपळूण ३१ १६९.५०
गुहागर १७ ९८.५०
संगमेश्वर ६७ २५५.५०
रत्नागिरी २२ १५४.००
लांजा १५ ६९.००
राजापूर १५ ११९.५०
एकूूण------------ २४९ १२७८.५५