रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे उपोषण सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासन ढिम्मच आहे. दरम्यान, आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष सोनपरोते व पुण्यातील पदाधिकारी बुधवारी रत्नागिरीत येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.२ची अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सेवामुक्त लिपिक - टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. सोमवार ते सोमवार आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतल्याचे दिसून येत नसल्याची खंत आफ्रोहच्या वतीने व्यक्त करण्यात आली. देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच काम असतांना मात्र नकारार्थी भूमिका घेऊन हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२० रोजी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले.
संबंधित कार्यालयाकडूनच अधिसंख्य पदाचे आदेश देण्यात येतात व प्रशासकीय विभागाकडून या अधिसंख्य पदाला मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गजेंद्र पौनीकर यांना माहिती अधिकारात कळविले आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाकडे आफ्रोह संघटनेने विलास देशमुखांच्या प्रकरणात पाठपुरावा केला असता महसूल विभागाकडूनच यावर कार्यवाही करणे अभिप्रेत असल्याचे, सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्रांगड्यात विलास देशमुख १८ महिन्यांच्या वेतनापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही पौनीकर यांनी केला आहे.
गेले सात दिवस विलास देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने देशमुख यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आफ्रोह पुण्याची टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोतेही रत्नागिरीत येत असून, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी दिली.