रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषद आणि 'व्हेटस् फॉर अॅनिमल्स' कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 1257 श्वान पकडून त्याचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या मोहिमेत एकाच दिवसात तब्बल 31 श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण करण्यात आल्याची माहिती 'व्हेटस् फॉर अॅनिमल्स' कराडचे मॅनेजर सचिन देऊळकर यांनी ‘लोकमत’शी दिली. रत्नागिरी शहरात श्वानांचे प्रमाण वाढले आहे. या श्वानांकडून वाहनांचा पाठलाग करणे, पादचा-यांना चावणे अशा घटना घडत आहेत. नागरिकांमधून होणा-या तक्रारींची दखल घेत रत्नागिरी नगर परिषदेने श्वानांचे निर्बिजीकरण आणि अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहिमेला 8 नोव्हेंबर 2017 पासून सुरुवात केली.
नगर परिषद रत्नागिरी आणि 'व्हेटस् फॉर अॅनिमल्स' कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला श्वानांची संख्या जास्त होती. मात्र, त्यानंतर श्वान मिळण्याचे प्रमाण कमी होत चालले.श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण डॉ. सचिन ढालकर हे करतात. शहरातील नगर परिषद शाळा नं. 2 या ठिकाणी शाळेतीलच तीन-चार खोल्या घेऊन तेथे हा उपक्रम राबवला जातो. ज्या श्वानांवर हे उपचार केले जातात. त्या श्वानांचा उजवा कान ‘व्ही’ आकारात वरच्या बाजूला कापला जातो. त्यावरुन पुन्हा ते श्वान दिसताच त्याच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे असे समजते.
त्याच ठिकाणी सोडतातया निर्बिजीकरणासाठी ज्या ठिकाणाहून श्वानांना पकडले जाते, निर्बिजीकरण आणि लसीकरण केल्यावर त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो. आतापर्यंत 1257 श्वान पकडल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ही मोहीम अशीच चालू राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.