राजापूर : रविवारी शहरानजीकच्या कोंढेतड गाडगीळवाडी भागात उच्च दाबाने झालेल्या वीज पुरवठ्यामुळे या भागातील आठ ते दहा ग्रामस्थांचे टीव्ही, फ्रिज, कुलर, फोन, मोबाईल अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
उच्च दाबाने वीज पुरवठा होत असल्याची माहिती देऊनही महावितरणकडून योग्य दखल घेतली गेली नाही, असा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.
रविवारी दुपारी ते सायंकाळी यादरम्यान वीज पुरवठा कमी जास्त होत होता. याबाबत ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला होता. तसेच अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
महावितरणच्या दुर्लक्षामुळे उच्च दाबाने पुरवठा सुरू झाला. त्यामुळे घरात सुरू असलेले टीव्ही, फ्रिज, मिक्सर, मोबाईल फोन जळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महावितरणने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.