चिपळूण : तालुक्यातील टेरव टेटवीचा माळ येथे वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता कोळशाच्या दोन भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या कारवाईत एकूण २१ भट्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी गोविंद कोले यांना टेरव येथील कोळशाच्या भट्टीची खबर मिळताच त्यांनी वनपाल आर. बी. पाताडे, रामपूरचे वनरक्षक रामदास खोत, कोळकेवाडीचे वनरक्षक सुर्वे यांच्या पथकाला सांगून ही कारवाई केली. पाताडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कोळशाच्या दोन भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. मात्र या भट्ट्या कोणाच्या आहेत, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.टेरव परिसरात गेले दोन ते तीन महिने कोळशाच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे काम वनखात्याने सुरू केले आहे. एकनाथ माळी यांनी प्रथम तक्रार केल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. यापूर्वी एक ते दोन वेळा आरोपी सापडले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु, तरीही भट्ट्या लावण्याचे प्रमाण सुरूच आहे. वनखात्याने आतापर्यंत २१ भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेत्र वनअधिकारी गोविंद कोले, फिरत्या पथकाचे परीक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील यांच्या सूचनेनुसार ही ठोस कारवाई करण्यात आली. या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)
कोळशाच्या आणखी दोन भट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Published: June 09, 2016 12:43 AM