गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांबरोबरच येथील ग्रामस्थांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील चिमणपऱ्यामध्ये परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्याने आता गणपतीपुळे ग्रामस्थ व पर्यटकांसाठी दुर्गंधी ही रोजचीच डोकेदुखी झाली आहे.गणपतीपुळेतील कोल्हटकर तिठा या ठिकाणीही दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे येथे डासांचे प्रमाणही वाढले आहे. नव्याने बांधलेल्या इमारतींचे सांडपाणी या वहाळांमध्ये राजरोसपणे सोडल्याचे येथील रहिवासी महेश कुबडे यांनी सांगितले. गणपतीपुळे येथे सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरु आहे. दररोज सध्या हजारो पर्यटक गणपतीपुळे येथे दर्शन तसेच सहलीसाठी येतात. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र, पर्यटकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अख्ख्या गावाचं सांडपाणी या पऱ्यातच सोडले जात असून, त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांना नाकाला रुमाल लावूनच पुढे जावे लागत आहे. यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी, अशी मागणी पर्यटकांमधून करण्यात येत आहे.या सांडपाण्यामुुळे निर्माण होणारी दुर्गंधी, डासांची होणारी पैदास आणि त्यातून उद्भवणारी रोगराई याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ दत्ताराम सुर्वे, विश्वनाथ पालकर, महेश कुबडे व अन्य ग्रामस्थ यांनी आरोग्य विभागाजवळ लेखी तक्रार करुनही आरोग्य खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतीला विसर : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माणपरिसरातील लॉज व हॉटेल व्यावसायिकांनी कोल्हटकर तिठ्यातील वहाळात सोडलेली सांडपाण्याची घाण व दलदल शिमगोत्सवाच्या काळात ग्रामपंचायतीने स्वखर्चाने साफ केली. त्यावेळी कोल्हटकर तिठा येथील एका विहिरीचे पाणी यामुळे दूषित झाले होते. त्यामुळे जेसीबी लावून हा वहाळ साफ करण्यात आला व आठ ते दहा दिवसांत याठिकाणचे सांडपाणी हे पाईपलाईनद्वारे योग्य ठिकाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज या आश्वासनाला दोन ते तीन महिने कालावधी लोटला असून, सोईस्करपणे ग्रामपंचायतीला याचा विसर पडला आहे.- विश्वनाथ पालकर
आज गणपतीपुळे गावातील गटारांचा मोठा प्रश्न आहे. विकास आराखड्यात ही गटारे बंदिस्त होणार आहेत. मात्र, यासाठी किती कालावधी लागेल हे आज सांगता येत नाही. आज मीही याच रस्त्यावरुन ये-जा करत असतो. कोल्हटकर तिठ्यात गेल्यानंतर प्रचंड दुर्गंधी येते. पावसाळ्यातील पाणी जाण्याच्या वहाळाला आज एका लॉजचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या लॉज व्यावसायिकांनी या वहाळाला पाणी सोडलं आहे, त्यांनी त्यांच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.- दत्ताराम सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
विल्हेवाट लावावीगणपतीपुळे ग्रामपंचायतीने या सांडपाण्याची अन्यत्र विल्हेवाट लावावी किंवा बंदिस्त गटारामधून ते सोडण्यात यावे. तरच हा प्रश्न सुटू शकतो, असे मत गावातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत आता याबाबत कोणता निर्णय घेते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.