लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील ड्युरा ऑक्सिजन प्रणालीची दुरवस्था झाली असून, ही गंभीर बाब आहे, अशी खंत हिराभाई बुटाला विचार मंचचे कौस्तुभ बुटाला यांनी येथे व्यक्त केली. खेड नगर परिषदेत सोमवारी (दि. २६) आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
हिराभाई बुटाला विचार मंचतर्फे खेड नगर परिषदेला होम क्वारंटाईन डॅशबोर्ड व टेलिमेडिसिन असे दोन अँड्रॉईड मोबाईल ॲप प्रदान करण्यात आले. यावेळी कौस्तुभ बुटाला, माजी आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित होते. नगराध्यक्ष खेडेकर यांच्याहस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कौस्तुभ बुटाला म्हणाले की, होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची देखभाल करण्यासोबतच कोरोनाचा प्रसार होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी डॅशबोर्ड ॲप उपयोगी पडणार आहे, तर टेली मेडिसिन ॲपद्वारे घरी अलगीकरणात असलेल्या रुग्णांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे वैद्यकीय सल्ला घेता येणार आहे.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आलेल्या महत्त्वाच्या ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर प्रणालीची दुरवस्था झाली असल्याचे बुटाले म्हणाले. हा प्रकार का झाला, याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
...........................
ऑक्सिजन छावणी उभारणार
आम्ही खेड नगर परिषदेला तीन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दिले आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन छावणी हा उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती यावेळी बुटाला यांनी दिली.
......................
khed-photo 261 खेड येथील नगर परिषदेत ॲपचे लोकार्पण नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कौस्तुभ बुटाला, माजी आमदार संजय कदम, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित हाेते.