राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व आपदग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळाली पाहिजे. तर राजापुरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे राजापुरात लवकरात लवकर कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर गुरुवारी आलेले राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सिंधुदुर्गकडे रवाना होताना राजापुरात थांबले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.
राजापूर एस. टी. डेपोसमोर राजापूर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी तौक्ते चक्रीवादळातील नुकसानाची माहिती दिली. आपत्ती काळात भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी आपदग्रस्त भागाचा दौरा करून आपदग्रस्तांना वैयक्तिक स्वरूपात केलेल्या मदतीबाबतही गुरव यांनी माहिती दिली. मात्र, शासनाकडून अद्याप काहीच मदतीची घोषणा झालेली नाही, असे सांगितले.
राजापुरात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून, राजापुरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड रुग्णालय नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी वा कोल्हापूरला जावे लागत असल्याचे सांगितले. राजापुरात कोविड रुग्णालय व्हावे, अशी मागणी करूनही इथले मंत्री, खासदार आणि आमदार काहीच करत नाहीत अशी कैफियत गुरव यांनी मांडली. यावेही आपण निश्चितच आपल्या या मागण्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करून मार्गी लावू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महिला आघाडी अध्यक्ष श्रुती ताम्हनकर, नगरसेवक गोविंद चव्हाण, महादेव गोठणकर, मारुती कांबळे, शिल्पा मराठे, शीतल पटेल, अरविंद लांजेकर, मोहन घुमे, विजय कुबडे, अॅड. सुशांत मराठे, सुहास मराठे, धनंजय मराठे, रमेश गुणे, आशिष मालवकर, संदेश आंबेकर, वधू खलिफे, सुधा चव्हाण आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------------
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजापुरातील प्रश्नांबाबत तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी माहिती दिली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे उपस्थित हाेते.