गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी श्रींचे स्पर्श दर्शन घेतले.
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात गणेश चतुर्थीला वर्षातून एकदाच साध्या वेशात स्पर्शदर्शन मिळते. त्यामुळे ग्रामस्थ व भक्तांनी रात्री एक वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येऊन मंदिरामध्ये श्रींची पूजा, मंत्रपुष्प आरती होऊन मंदिर सर्व भक्तांसाठी साडेचार वाजता उघडण्यात आले. गणपतीपुळेसह परिसरातील मालगुंड, वरवडे, निवेंडी भगवती नगर, भंडारपुळे, नेवरे या परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
गणपतीपुळे मंदिरामध्ये श्रींचे स्पर्शदर्शन दुपारी साडेबारा वाजता बंद करण्यात आले. यानंतर आरती होऊन मंदिराचे मुख्य पुजारी अमित धनवटकर यांनी गणपतीसमोर फुलांच्या पाकळ्यांपासून आरास केली. मालगुंड येथील प्रसिद्ध रांगोळी व चित्रकार राहुल कळमटे यांनी श्रींची सुबक रांगोळी तसेच अष्टविनायकाची रांगोळी काढली, हे खास आकर्षण ठरले.
सायंकाळी साडेचार वाजता श्रींच्या पालखीचा प्रदक्षिणा सोहळा झाला. यावेळी अनेक भाविक, पर्यटक, ग्रामस्थ, देवस्थान कर्मचारी तसेच पोलीस ही सहभागी झाले होते.
गणपतीपुळे येथे ‘एक गाव एक गणपती’ ही पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा अजूनही जोपासली जात आहे. गणपतीपुळे येथे कोणाच्याही घरी गणपतीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही. सर्वजण मंदिरातील श्री गणेशाची पूजा करतात. त्याऐवजी घरोघरी गौरी आणण्याची प्रथा अनोखी आहे. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे भक्त पर्यटकांना श्रींचे स्पर्श दर्शन घेता आले नाही. यंदा ही संधी मिळाल्याने हजारो भाविक येथे उपस्थित होते.