देवरुख : रविवार आणि सोमवारी तौक्ते चक्रीवादळाने कोकणात हाहाकार उडवला. अर्थातच याचा मोठा फटका महावितरणला बसला. यामुळे रविवारी सकाळीच संगमेश्वर तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा फटका ग्रामीण रुग्णालयादेखील बसला. रुग्णालय जवळ जवळ दोन दिवस अंधारात असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रीच्या वेळेस चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णसेवा देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असा प्रकार सोमवारी रात्री दिसून आला आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारे रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या या रुग्णालयाचा कारभार जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या क्वॉर्टर्समधून चालत आहे. या ठिकाणी तुटपुंज्या जागेतूनच रुग्णसेवा केली जात आहे.
देवरुखला चार ते पाच ठिकाणी लाईनवर वृक्ष कोसळल्याने शहर अंधारात होते. मात्र शहरात असलेले कोविड सेंटर लक्षात घेऊन त्या भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र या सगळ्या प्रकारात देवरुख ग्रामीण रुग्णालय मात्र अंधारातच राहिले. रात्री वीज नसूनही अचानक येणाऱ्या सगळ्या रुग्णांवर येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपचार करत होते. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम सुरू असल्याने छोट्याशा जागेत या रुग्णालयाचा कारभार सुरु आहे.
अत्यावश्यक काळात विद्युतपुरवठा नसेल तर उपचार करायचे कसे? एवढ्या छोट्या जागेत रुग्णालयाची पर्यायी व्यवस्था केली जावी, ही खेदाची बाबच म्हणावी लागेल. पर्यायी व्यवस्था असती तर तेथील अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णांसोबत असलेले नातेवाईक यांना मोबाईल टॉर्चचा वापर करण्याची वेळ आली नसती. आता या घटनांचा विचार करून पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध होणे गरजेचे झाले आहे.