देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयाचा विद्यार्थी विलास विजय रहाटे याची मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघात ‘३३ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी’ निवड झाली आहे. ३३ वा आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव दिनांक १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत रांची विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे होणार आहे.
विलास रहाटे या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असून, फाईन आर्ट (उपयोजीत कला) या प्रकारातील ‘क्ले मॉडेलिंग’ (मातीकाम) या कलाप्रकारात तो आपले नशीब आजमावणार आहे. विलासने या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करताना डिसेंबर २०१७मध्ये पार पडलेल्या ३३ व्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात क्ले मॉडेलिंगमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. ही ३३ वी पश्चिम विभागीय स्पर्धा मोहनलाल सुखदिया विद्यापीठ, उदयपूर (राजस्थान) येथे संपन्न झाली होती. विलास याने यावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी आयोजित केलेल्या ‘१५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक इंद्रधनुष्य युवा महोत्सवा’त मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली होती. यावर्षी फाईन आर्ट स्पर्धा प्रकारात केवळ विलासने दोन सुवर्णपदके पटकावून मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक कायम ठेवला आहे.
विलास याला विविध उपयोजीत कला प्रकारांसाठी निवृत्त कलाशिक्षक विजय आंबवकर, विष्णू परिट, सूरज मोहिते, लक्ष्मीकांत साळसकर, मंगेश नलावडे, प्रा. संदीप पवार, प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विलासचे कौतुक करताना विलासने यावर्षी मिळवलेल्या सातत्यपूर्ण यशात त्याची जिद्द व मेहनत व त्याला गुरुजनांचे मिळणारे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. विलास राष्ट्रीय यस्तरावर उत्तुंग यश मिळवून विद्यापीठासह संस्था व महाविद्यालयाचे नाव मोठे करेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी व्यक्त केला आहे.