बुधवारी रात्री (२१.०७ वाजता) ते गुरुवारी पहाटे (२ वाजता) चिपळूण शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी एकमेकांना मोबाईलवरुन संपर्क करण्यास सुरुवात केली. २६ जुलै २००५ला महाराष्ट्रात महाप्रलय झाला होता, त्या अंदाजाने व्यापाऱ्यांनी आपले दुकानातील सामान, माल उंचावर ठेवण्यास (त्यावेळच्या पूररेषेच्यावर) सुरुवात केली आणि काही व्यापारी सामान आटोपून परत आपापल्या घरी जाता येणार नाही म्हणून त्यादिवशी पहाटे पाच वाजता घरी गेले.
मात्र, सकाळी साडेसात ते साडेआठ या एका तासात होत्याचं नव्हतं झालं. वरुन कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेली भरती आणि कोयनानगरच्या कोळकेवाडी धरणातून केलेला पाण्याचा विसर्ग, यामुळे एका तासात आठ ते दहा फूट पाणी बाजारपेठेत आले. चिपळूण शहर हे कपबशीसारखे आहे. शहरातील नदी फक्त एक इंच खाली आहे. जे व्यापारी दुकानाजवळ हजर होते ते आपले सामान वर आणखी वर नेऊ लागले. परंतु, पाणी दुकानात जाऊन दुकानाच्या वरुन एक फूट ते चार फूट वाहू लागले. माझ्या दुकानाच्या वरुन पाणी एक फूट वाहू लागले. माझा मुलगा जीव वाचवण्यासाठी दुकानातून मागील बाजूने डोंगरातून घरी आला. माझे घर शहरातील उंच भागावर आहे तरीही घरात प्रथमच ४ फूट पाणी एका तासात आले. डोळ्यादेखत सर्व काही वाहून गेले. दुकानाचे शटर तोडून पाणी आत शिरले आणि टी. व्ही., मोबाईल, अन्नधान्य वाहून गेले. अत्यंत छोटा व्यापारी (१ लाख रुपये) ते मोठे व्यावसायिक (दीड ते दोन कोटी) इतके नुकसान झाले आहे.
या प्रलयाला निव्वळ आणि निव्वळ धरणातील पाणी सोडणारे आणि ते पाणी सोडले जाणार आहे, हे माहीत असूनही आम्हाला अलर्ट न करणारे सर्व अधिकारी जबाबदार आहेत. पाणी सोडायलाच लागते अन्यथा धरणाला धाेका असतो. परंतु, हवामान खात्याने पाच दिवस प्रचंड पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तवला होता. त्या पाच दिवसांत टप्प्याटप्याने पाणी सोडले असते, ओहोटीच्या काळात सोडले असते तर हे अस्मानी संकट टळलं असतं.
मी आणि सहकाऱ्यांनी शासनाने आम्हाला १० वर्षांसाठी १ टक्क्याने २ लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज द्यावे, पहिले १ वर्ष हप्ते घेऊ नयेत तसेच आताच सर्व कर्ज एकदाच माफ करावे, (प्रत्येकवेळी शेतकऱ्यांनाच माफी मिळते. ती गैर नाही) अशी विनंती आणि मागणी केलेली आहे.
आता मोठ्या प्रमाणात रोगराई पसरणार आहे. त्यासाठी डाॅक्टरांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी येईलच. सगळीकडे कुबट वास आहे. आज तीन दिवसाने दुकानातील माल बाहेर काढला जाईल, तेव्हा अनेक कचरा गाड्यांतून ही घाण उचलली जाईल.
आम्ही व्यापारी खचलेलो नाही. आम्ही यातूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारणारच, हा आत्मविश्वास आहे. पण एकच मनात हुरहूर आहे. आज माझं वय ५८ आहे. आम्ही आमच्या पुढील पिढीच्या हातात आमचा व्यवसाय देताना त्यांच्या हातात उज्ज्वल भविष्यकाळ देणार आहोत का? कारण आमच्या डोक्यावर कोळकेवाडी धरण नावाचा जिवंत बाॅम्ब उभा आहे.
(लेखक चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष आहेत.)
----------------------------
दहा वर्ष चिपळूण मागे गेले
तुम्ही म्हणाल विमा असेल, तो आहे ना, पण २५ टक्के दुकानदारांचाच आणि तोही २००५च्या पूररेषेच्यावरती असलेल्या सामानाचाच मिळणार. चारचाकी गाड्या एकमेकांवर आदळल्या. काही गाड्या ५०० फूट वाहून गेल्या, कितीतरी उलट्या होऊन झाडात वगैरे ठिकाणी अडकल्या. ३० ते ३५ टक्के गाड्या पाण्याखाली असल्यामुळे त्या फक्त आता स्क्रॅबमध्येच जाणार. मी स्वत: २००५चा पूर पाहिलेला आहे. परंतु, आता २२ जुलै २०२१चा महाप्रलयाचा थरार भयानक होता. संपूर्ण चिपळूण शहर आता दहा वर्ष मागे गेले आहे. कोरोनामुळे तीन महिने व्यवसाय ठप्प होता. त्यात पाच व्यापाऱ्यांच्या मागे घरातील एक ते चार सदस्य कोरोनाने ॲडमिट झालेले (त्यातील काही जग सोडून गेले) त्यात आता पुराचा फटका बसला आहे.