रत्नागिरी : मच्छीमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नाैकेच्या डिझेलवर देण्यात येणाऱ्या अनुदानाची थकबाकीची रक्कम वितरित करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे दोन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे.
मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नाैकेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदान स्वरूपात केली जाते. मात्र, गेल्या काही काळापासून हे अनुदान थकीत असल्याबद्दल मत्स्यव्यवसाय, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन प्राप्त झाली होती. या निवेदनांची दखल घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाला अनुदानाची थकबाकी लवकरात लवकर वितरित करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाने आदेश काढला आहे.
डिझेल परताव्याच्या थकबाकीचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. या अनुदानापोटी १८ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर या थकीत निधीचे वितरण करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी दाेन काेटींचा डिझेल परतावा मंजूर करण्यात आला आहे. हा परतावा लवकरच मच्छिमारांना देण्यात येणार आहे. ऐन दीपावलीच्या दिवसात थकबाकीच्या वितरणाचे आदेश काढल्यामुळे मच्छिमार बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
वाढत्या महागाईने मच्छिमार भरडला गेला आहे. मासे मिळण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यामुळे डिझेलचे वाढलेले दर मासेमारीसाठी जाणाऱ्या नाैकांना परवडत नाहीत. त्यामुळे शासनाने डिझेलचा परतावा वेळीच दिला तर ताे फायद्याचा ठरेल. - निसार दर्वे, मच्छिमार नेता, मिरकरवाडा, रत्नागिरी.
मागील दाेन वर्षे डिझेल परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने मागील राहिलेला संपूर्ण परतावा वेळीच द्यावा. जाे परतावा मंजूर केला आहे, ताे संपूर्ण जिल्ह्यातील मच्छिमारांना पुरेसा आहे का, याचाही विचार करावा. - शब्बीर भाटकर, मच्छीमार नेता, राजीवडा, रत्नागिरी.