रत्नागिरी : एका बँकेच्या उद्घाटनासाठी अभिनेते दिलीपकुमार रत्नागिरीला आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर पोलीस मैदानावर झालेल्या सभेत दिलीपकुमार यांनी सिनेसृष्टीतील अनेक प्रसंग सांगितले होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने १९७६मधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून, उद्घाटन सोहळ्यातील काही प्रसंग रत्नागिरीकरांच्या स्मरणात आजही आहेत.
उद्योजक पै. कासम ठाकूर व पै. एम.डी. नाईक यांच्या निमंत्रणावरून अभिनेते दिलीपकुमार रत्नागिरीतील बँकेच्या उद्घाटनासाठी आले होते. करंजारी येथील ठाकूर यांच्या निवासस्थानावरून ते मोटारीने रत्नागिरीत आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर पोलीस मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी त्यावेळी अडीच ते तीन हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होते. लाडक्या अभिनेत्याला जवळून पाहण्याची क्रेझ तर होतीच, शिवाय ऐकण्याची संधी होती.
दिलीपकुमार यांनी यावेळी सिनेजगतातील अनेक आठवणींना उजाळा दिला हाेता. ‘आन’ या प्रथम भारतीय रंगीत चित्रपटाचा प्रीमियम शो लंडन येथे होता. शोनंतर राणी एलिझाबेथ यांनी सर्वांसाठी डिनरचा कार्यक्रम ठेवला होता. शाही व्यवस्था असल्याने टेबलावर सोन्याचे चमचे, वाट्या ठेवण्यात आल्या होत्या. काॅमेडी अभिनेते असलेल्या मुकरी यांनी हळूच एक चमचा खिशात ठेवल्याचे लक्षात आले. ते अस्वस्थ झाले. आपल्या देशाचे नाव खराब होऊ नये यामुळे ते चलबिचल झाले होते. राणी एलिझाबेथ यांनी डिनर सुरू होण्यापूर्वी आपण काय कराल, असा दिलीपकुमार यांना प्रश्न केला. विचारांती त्यांनी आपण जादूचा प्रयोग करणार असल्याचे सांगितले. त्यावर सर्वांनी होकार दर्शविला. दिलीपकुमार यांनी आपण एक चमचा उचलून खिशात ठेवत असल्याचे सांगून हा चमचा पुढच्या क्षणी दुसऱ्याच्या खिशातून काढणार असल्याचे सांगितले. त्यांनी मुकरी यांच्या खिशात चमचा असून त्यांनी बाहेर काढावा, असे सांगितले. मुकरी गोंधळले, त्यांनी खिशात हात घालून चमचा टेबलावर ठेवला. टाळ्याच्या कडकडाटात दिलीपकुमार यांना दाद देण्यात आली.
जेवण संपल्यानंतर मुकरी यांनी अभिनेते दिलीपकुमार यांना चमचा राहू दिला असता तर काय बिघडले असते, असे विचारले. त्यावर दिलीपकुमार यांनी इंग्रजांच्या देशात माझ्या भारत देशाचे नाव चोरीमुळे खराब झाल्याचे आवडणार नसल्याचे सांगितले. प्रसंग सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली, शिवाय भारतमातेचा जयघोषही केला हाेता.
ज्या बँकेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दिलीपकुमार आले होते, त्या बँकेचे संचालकपद गेली २२ वर्षे बशीर मुर्तुझा भूषवित आहेत. त्यांनी अभिनेते दिलीपकुमार यांना अभिवादन करताना, जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळकरी विद्यार्थी म्हणून आपण मित्रासमोर त्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले.
--------------------------------
हकीम रत्नागिरीचे असल्याने आलाे
‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकासमवेत सिराज हकीम हेही होते, मात्र ते रत्नागिरीचे होते. मला रत्नागिरीला येण्याचे आमंत्रण संयोजकांनी दिले तेव्हा हकीम यांचे गाव असल्याने तत्काळ होकार दर्शविल्याचे दिलीपकुमार यांनी त्यावेळी सांगितले हाेते.