रत्नागिरी : अपघातात जखमी झालेल्या मित्राला बरे वाटले, तर आम्ही चालत येऊ, असे साकडे देवरूख येथील मार्लेश्वराला नाणीज येथील काही तरुणांनी घातले हाेते. हा मित्र बरा झाला आणि त्यानंतर हे तरुण नाणीज ते मार्लेश्वर, असे ५५ किलाेमीटरचे अंतर पार करून मार्लेश्वरला पाेहाेचले. त्यानंतर गेले सहा वर्षे त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला असून, त्यात तरुणांची वाढ हाेत आहे.
नाणीज येथील सुशांत संसारे हा तरुण २०१६ मध्ये अपघातात जखमी झाला होता. तो बरा व्हावा म्हणून त्याच्या मित्रांनी मार्लेश्वरला प्रार्थना केली होती. तो लवकर बरा झाला, तर आम्ही तुझ्या दर्शनाला पायी येऊ, असे साकडे घातले. पुढे तो बरा झाला आणि त्याच्या मित्रांनी चालत जात मार्लेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर हा उपक्रम सुरूच ठेवण्यात आला आणि दरवर्षी श्रावणात ही मंडळी मार्लेश्वराच्या दर्शनाला जातात. सुरुवातीला त्यात संदेश सावंत, अक्षय नागवेकर, प्रथमेश सागवेकर, गणेश संसारे आणि तेजस्विनी संसारे सहभागी झाले होते. आता दिंडीतील लोकांची संख्या वाढली आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे या दिंडीत खंड पडला होता. मात्र, यावर्षी पुन्हा हा उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी ३० जण या दिंडीत सहभागी झाले होते. त्यामध्ये १२ युवती व महिला, १८ पुरुषांचा सहभाग हाेता. सर्वांनी नाणीजचे ग्रामदैवत श्री धावजेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरातून रविवारी सकाळी १० वाजता पायी प्रवासाला सुरुवात केली. सोमवारी पहाटे ४ वाजता ते मार्लेश्वरला पोहोचले. दर्शन घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.