रत्नागिरी : डिंगणी-जयगड रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील एकूण १० नळपाणी पुरवठा योजना बाधित होत असल्याचा अहवाल उपअभियंत्यांनी पाहणीनंतर जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या कामाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे.मालाची ने-आण करण्यासाठी सोपा मार्ग बंदर हा असल्याने त्याला रेल्वे मार्गाने जोडल्यास व्यवसायासह विकासालाही चालना मिळणार आहे, असा मुद्दा खासगी कंपनीकडून पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे डिंंगणी- जयगड रेल्वे मार्गाची आखणी करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास जयगड बंदर थेट कोकण रेल्वेला जोडले जाणार असून, महामार्गावरील वाहतूक कमी होणार असून, व्यावसायिकदृष्ट्या हे फायद्याचे ठरणार आहे.डिंंगणी - जयगड रेल्वे मार्ग हा व्यापारी दृष्टीकोनातून फायद्याचा असला, तरी ज्या गावांमधून हा मार्ग जाणार आहे तेथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा या रेल्वेमार्गाला तीव्र विरोध असल्याने खासगी कंपनीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रेल्वे प्रकल्पाबाबत जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार चर्चा झाली होती. त्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले होते.त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने उपअभियंत्यांना डिंगणी - जयगड रेल्वे मार्गाची पाहणी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपअभियंत्यांनी या मार्गाची पाहणी करुन अहवाल दिला होता.
त्यामध्ये या रेल्वे प्रकल्पामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावातील घडशीवाडी, कांबळेवाडी, कुंभारवाडी, शिंदेवाडी, भोसलेवाडी, लांजेकरवाडी, बौध्दवाडी, कडेवठार, देसाईवाडी, शंकरवठार आणि रत्नागिरी तालुक्यातील खालगाव धारेखालची विहीर अशा नळपाणी पुरवठा योजना बाधित होत असल्याचे अहवालात उपअभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. या रेल्वे मार्गाच्या कामामुळे नळपाणी पुरवठा योजना बाधित झाल्यास भविष्यात येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याने ग्रामस्थांचाही विरोध आहे.या प्रकल्पामुळे नळपाणी पुरवठा योजनाच नव्हे तर त्याबरोबरच रस्तेही बाधित होणार आहेत. त्यामध्ये देऊड - लावगणवाडी - चिंचवाडी रस्ता, जाकादेवी - खालगाव - राई रस्ता, खालगाव बौध्दवाडी रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. ही नुकसानभरपाई कंपनीकडून लिखित स्वरुपात दिली जात नाही, तोपर्यंत या प्रकल्पाचे काम करावयास द्यायचे नाही, असा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता.अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्तारत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाचा प्रश्न जोरदार गाजला होता. त्या सभेत हा रेल्वे मार्ग कोणत्या कंपनीसाठी नेण्यात येत आहे, असा प्रश्न त्याठिकाणी उपस्थित असलेल्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्यांनी विचारला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कंपनीचे नाव सभागृहाला न सांगता वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त सदस्यांनी ह्यत्याह्ण अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर व्हा, अशा शब्दात सुनावले होते. सदस्य संतप्त झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.