आवाशी : लोटे - परशुराम वसाहतीतून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यामुळे मच्छीमारी धोक्यात आली आहे. या सांडपाण्यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सी. ई. टी. पी.समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनानंतर जगबुडी, वाशिष्टी, दाभोळ खाडीसह सी. ई. टी. पी.च्या कमिटीकडून कंपनीची पाहणी करण्यात आली. मात्र, या पाहणीबाबत सी. ई. टी. पी.चे संचालक मंडळच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे, याची चर्चा सुरू आहे.गेल्या आठवड्यात खेड तालुक्यातील लोटे - परशुराम वसाहतीतून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यामुळे धोक्यात आलेल्या मच्छीमारीबाबत खेड तालुका भाजपच्यावतीने येथील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र सी. ई. टी. पी.समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. या धरणे आंदोलनावेळी पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, सरचिटणीस प्रशांत शिरगावकर यांच्यासह खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर या तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एम. आय. डी. सी., एम. पी. सीब. बी., सी. ई. टी. पी. यांना काही प्रमुख मागण्यांचे पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. भाजपने कंपनीला ठराविक मुदत दिली होती. या मुदतीत कोणतीच कारवाई न झाल्याने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याची दखल न घेतल्यास प्रसंगी संवेदनशील विभागात मुख्यमंत्र्यांना सांगून बदल्या करण्यात येतील, असे बाळ माने यांनी आपल्या भाषणात ठणकावले होते. त्याचबरोबर हे आंदोलन पुढेही सुरु राहणार असल्याचे बजावले होते. याच धर्तीवर २ रोजी मत्स्य विभागाच्या वतीने डॉ. चंद्रप्रकाश, डॉ. राठोड, डॉ. देशपांडे, श्याम म्हात्रे ज्यांनी अलिबाग येथील धरमतर खाडीची पाहणी केली त्या समितीचे सदस्य या भागातील वरील नद्यांची पाहणी करण्याकरिता येथे आले होते.या तिन्ही नद्यांची पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील सी. ई. टी. पी.ला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत खेडचे तहसीलदार अमोल कदम, बाळ माने, मंडल अधिकारी, तलाठी व एम. पी. सी. बी.चे अधिकारी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सोमवारी सी. ई. टी. पी.ला सुटी असल्याने कामगारांव्यतिरिक्त कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ही झालेली पाहणी अधिकृत की अनधिकृत यावर सध्या संचालक मंडळातच चर्चा सुरू आहे. काहींनी तर आम्हाला सी. ई. टी. पी.ला सूचना दिल्याखेरीज मेंबर आॅफ सेक्रेटरी एम. पी. सी. बी. व एम. आय. डी. सी. या दोघांना वा एम. आय. डी. सी.च्या अधिकाऱ्यांनाच आवारात जाण्यास परवानगी असून, अन्य कुणालाही आमच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. त्याचबरोबर आम्ही अथवा आमचा एकही अधिकारी हजर नसताना संबंधितानी अशी भेट देणे अथवा प्रकल्पाच्या प्रक्रिया विभागात जाणे म्हणजे खेदाची बाब असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तेथील जे पाण्याचे नमुने घेतले गेले आहेत, तेदेखील चुकीचे असल्याचे समजते. त्यामुळे पदाधिकारी व मत्स्य विभाग समितीने केलेली पाहणी शुद्ध हेतूने केली गेली का? याबाबत शंका उपस्थित होत आहे. (वार्ताहर)बोलणे टाळले : अधिकारी संपर्काबाहेरसी. ई. टी. पी.चे चेअरमन सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. मात्र, ते दिल्ली येथे कामानिमित्त गेले असल्याचे सांगण्यात आले. इतर संचालकांनी याबाबत बोलणे टाळले. त्याचबरोबर एम. आय. डी. सी.चे प्रभारी अभियंता आबा पाटील यांच्या खेर्डी, चिपळूण येथील कार्यालयात संपर्क साधला असता तेही मुंबई येथे कामानिमित्त गेले असल्याचे सांगण्यात आले.
कंपनीचे संचालक मंडळच अनभिज्ञ?
By admin | Published: May 07, 2016 12:18 AM