लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : दिव्यांग लाभार्थी व पालकांना पालकत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जिल्हास्तरावर उपस्थित राहणे आर्थिक व शारीरिकदृष्ट्या परवडणारे नाही. याबाबत पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर यांनी २९ जुलै २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. प्रशासनाने या समस्येची दखल घेत दिव्यांगांना तालुकास्तरावर पालकत्व पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे आता तालुकास्तरावर दिव्यांगांचे पालकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे.
दिव्यांगांना पालकत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे प्रस्ताव आवश्यक त्या परिपूर्ण कागदपत्रांसह गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे लागतात. त्यानंतर या प्रस्तावाची छाननी गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या शिफारशीनंतर पुढील कार्यवाहीसाठी हे प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयाकडे सादर केले जातात. त्याठिकाणी पडताळणी करिता दिव्यांगांना व त्यांच्या पालकांना उपस्थित राहणे शक्य हाेत नसल्याने ते प्रस्ताव परत पंचायत समितीकडे पाठवले जातात. त्यामुळे पडताळणीही तालुकास्तरावर होऊन दिव्यांगांना होणारा शारीरिक व आर्थिक व मानसिक त्रास कमी करावी अशी मागणी म्हामूणकर यांनी केली होती. याची जिल्हा प्रशासनाने दखल घेत तशी व्यवस्था उपलब्ध केली आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या प्रस्तावाचे यादीबाबत गटविकास अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.