मेहरून नाकाडे
रत्नागिरी : मुंबईतून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या दिव्यांगांनी आरे-वारे येथील झिपलाईनचा आनंद घेतला. रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) आणि ओशन फ्लाय झिपलाईनच्या गणेश चौघुले यांच्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्यांना प्रथमच अशी संधी दिल्याबद्दल झिपलाईन चालकांचे विशेष आभार मानले. पूजा चौधरी (वय २२ वर्ष मु. पो. कहेर, गुजरात.) हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. पूजा रेल्वेतून पडल्याने गुडघ्याखाली दोन्ही पाय काढावे लागले. पूजा तेव्हापासून व्हिलचेअरवर आहे. नोकरी शोधण्यासाठी ती मुंबईमध्ये आली असता ऐरोलीच्या फ्रेण्ड्स फाउंडेशनचे अध्यक्ष अनुपम नेवगी यांनी तिची संस्थेत राहण्याची व्यवस्था केली. रत्नागिरीला पर्यटनासाठी आली.
आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे, समीर नाकाडे यांनी तिची निवास, भोजनाची व्यवस्था केली. आरेवारे बीच दाखवत असताना तिने झिपलाईन पाहिले. त्या वेळी ओशन फ्लाय झिपलाईनचे गणेश चौघुले व सहकाऱ्यांनी झिपलाईन समजावून सांगून सांगितले व झिपलाईन केले. आरे-वाऱ्यातील डोंगरातून दोरीला सुरक्षित लटकत लटकत समुद्र पाहत जाण्याचा आनंद काही और आहे, असे पूजाने सांगितले.
नफीस अजीज वाघू (वय ५२, मुंब्रा) यांनीही झिपलाईनचा आनंद घेतला. एका कंपनीत टेक्नाशियन म्हणून सुरवातीला मुंबई व नंतर सौदी अरेबियात काम करत होते. २००६ साली पाचव्या मजल्यावर लिफ्ट जोडताना अपघात होऊन खाली कोसळले. मणक्याला मार लागल्याने कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्याने पॅराप्लेजिक झाले. ते व्हीलचेअरवर वावरत असले तरी इंटेरीयर डेकोरेटर म्हणून काम पाहतात. कोकण फिरण्यासाठी आले असताना, ओशन फ्लाय झिपलाईनवरून रोपवे वरून सफर करण्याचा आनंद घेतला. रोपवेने समुद्रावरुन सफर करताना खूप मजा आल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांची कोकण सफर यशस्वी करण्यासाठी ओशन फ्लाय झिपलाईनचे प्रमुख गणेश चौघुले, सुजित मयेकर, रंजित मालगुंडकर, ऋतिक मयेकर, रसिका वारेकर, आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे, मारुती ढेपसे, प्रिया बेर्डे यांचे सहकार्य लाभले.