चिपळूण : महाप्रलयात उद्ध्वस्त झालेले चिपळूण शहर आणि परिसर याला मोठ्या प्रमाणावर मदत आली. मात्र, भविष्याचा विचार करता, पूरग्रस्त चिपळूणबाबत व्यापक आणि सर्व परिमाणांचा विचार करून जागतिक दर्जाच्या पर्यावरण, वास्तुशास्त्रज्ञांना सोबत घेत, सर्व समावेशक डिझास्टर प्लॅन करावा लागेल. राष्ट्र सेवादल यामध्ये प्रमुख भूमिका घेईल. नवे चिपळूण उभारण्याच्या आराखडा शासनाला देऊ, असे राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गणेश देवी यांनी चिपळूण येथे सांगितले.
चिपळूणला मदतीचा हात देण्यासाठी तत्परतेने कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध भागांतील राष्ट्रसेवादल पथक सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी डाॅ.गणेश देवी चिपळूण येथे आले होते. त्यावेळी पूरग्रस्त परिस्थितीत काम करणारे कार्यकर्ते, पर्यावरण तज्ज्ञ, यांचे सोबत आयोजित संवाद बैठकीत विचार व्यक्त केले.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक राष्ट्रसेवादल राष्ट्रीय समिती सदस्य अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. बदलते पर्यावरण आणि पुराची वाढलेली पातळी, यामुळे काही लाख वस्ती असणारे हे शहर आणि वाशिष्ठीच्या खाेऱ्यात मानवी वसाहत आणि शेती उद्योगच धोकादायक रेषेच्या कक्षेत आले आहेत. त्यावर कायमस्वरूपी ठोस संशोधनात्मक उपायांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पूरग्रस्त भागात काम करणारे पर्यावरणीय आणि आरोग्य अभ्यासक डाॅ.राजे, डाॅ.रमेश्वर गोंड, पंकज दळवी, युयुत्सू आर्ते यांनी विचार व्यक्त केले.
डाॅ.देवी पुढे म्हणाले की, येथील पर्यावरणीय अहवाल याचा अभ्यास करून काही तज्ज्ञ आणि संशोधकांच्या मदतीने एक व्यापक चर्चासत्र पुढील महिन्यात चिपळूण येथे घेऊ. त्यानंतर, नवा डिझास्टर प्लॅन उभारत चिपळूणला पूरमुक्ततेसाठी आश्वस्थ करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. पूरपरिस्थिती अथवा आपत्कालीन परिस्थितीची सूचना देणारा ॲप विकसित करणे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पूरग्रस्त परिस्थितीत काम करणारे सेवादल कार्यकर्ते आणि श्रमदान पथके, तसेच प्रा.सुनील साळवी, मातृमंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिर्के, नवनाथ कांबळे, दशरथ घाणेकर आणि सानिका कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. चिपळूण पूरग्रस्त मदत नियंत्रण नियोजन कार्यात विशेष काम करणारे शरयू इंदूलकर, अनिल काळे, शिल्पा रेडीज, सुनील खेडेकर, जाफर गोठे, प्रकाश सरस्वती (डाकवे), सई वरवाटकर, राम शास्त्री, राजन इंदुलकर यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.संजय घवाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन डाॅ.ज्ञानोबा कदम यांनी केले. राष्ट्रसेवा दलाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमाकांत सकपाळ यांनी आभार मानले.