देवरूख : देवरूख- साखरपा मार्गावरील बावनदीनजीक शनिवारी बिबट्याचे बछडे असल्याचा समज झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच तत्काळ वन विभागाचे वनपाल, वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हे बछडे बिबट्याचे नसून, भाटवाघाचे असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती वनपाल सुरेश उपरे यांनी दिली.शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बावनदीनजीक मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दोन बछडे दिसून आले. हे बिबट्याचे बछडे असल्याची माहिती काही वेळातच सर्वत्र पसरल्याने त्यांना पाहण्यासाठी वाहनचालक, ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक सागर गोसावी, उपसभापती अजित गवाणकर, माजी सभापती बंड्या बोरूकर हे घटनास्थळी आले.वनपाल, वनरक्षकांनी या बछड्यांना खड्ड्यातून वर काढले. त्यानंतर पाहणी केली असता, ते बछडे बिबट्याचे नसून भाटवाघाचे असल्याचे पुढे आले आहे. सात ते आठ दिवसांची ही पिल्ले असल्याचे उपरे यांनी सांगितले. यावेळी अंधार पडल्याने काही वेळातच या पिल्लांना जन्म देणारी मादी त्याठिकाणी आली. मादी येत असल्याचे पाहताच बछड्यांना पुन्हा सुरक्षित जागी सोडण्यात आले. मादी आल्यानंतर ती या बछड्यांना घेऊन जंगलमय भागात निघून गेली.याबाबत वनपाल उपरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, सध्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होत आहेत. भाटवाघ व त्याची पिल्ले फिरताना चुकून थेट खड्ड्यात पडली असावीत. मात्र, ही दोन्ही पिल्ले सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याचे बछडे असल्याची माहिती कर्णोपकर्णी झाल्याने काहीसा गोंधळ उडाला. मात्र, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच हे बिबट्यावे बछडे नसून, भाटवाघाची पिल्ले असल्याची खात्री झाली.
चर्चा बिबट्याची, सापडली भाटवाघाची पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:14 PM