विहार तेंडुलकर
रत्नागिरी : परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु असून त्यामध्ये काहीजण फसले गेल्याचेही रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या झालेल्या फसवणुकीवरून दिसून आले असून या प्रकरणात एक टोळकेच सामील असावे, असा कयास काढला जात आहे.
याबाबत फसवणूक टळलेल्या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, जाळ्यात ओढतानाही पध्दतशीरपणे आणि आपल्याबाबत गैरसमज होणार नाहीत, अशा पध्दतीने ओढले जाते. तुमच्यामुळे मला नोकरीत बढती मिळाली म्हणून मी आपल्यावर खूष होऊन महागड्या भेटवस्तू देत आहे, असे मेरी नावाच्या या तरूणीने सांगितले. त्यानंतर महागड्या वस्तू खरेदी केल्याचे सांगून त्याचे फोटो, वस्तूचे पॅकिंग, एवढेच नव्हे तर कुरिअर केल्याची पावतीही पाठवली.
ज्या दिवशी कुरिअर भारतात पोहोचणार, त्याच दिवशी आपल्याला फोन आला आणि त्यांनी कुरिअर कंपनीच्या बँक खात्यात २६ हजार ५०० रुपये भरल्यावर आपले कुरिअर घरपोच केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र आधीपासूनच सावध असलेल्या या नागरिकाने आपण आपले पार्सल पोहोच झाल्यानंतरच आपण पैसे भरू, असे सांगितले. मात्र तत्पूर्वी त्याने त्या कुरिअरचा अकाऊंट नंबर टिपून घेतला.या अकाऊंटची माहिती घेतली असता फोन करणारी कुरिअर कंपनी दिल्लीतून फोन केल्याचे भासवते आणि पैसे भरण्यासाठी दिलेला बँक अकाऊंट नंबर हा बेंगलोर येथील असल्याचे दिसून आले. त्यामुळे फसवणुकीची पाळेमुळे ही अनेक ठिकाणी पसरली असल्याचे दिसून येते. यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे मत व्यक्त होत असून त्यामुळेच या सर्व गोष्टी पध्दतशीरपणे आणि कोठेही समोरच्या व्यक्तीला फसवणूक होईपर्यंत संशय येणार नाही, अशा पध्दतीने हाताळल्या जातात, असे म्हटले जात आहे.
मेरी नावाच्या एका मुलीने जे पार्सल रत्नागिरीतील नागरिकाला पाठवले होते, त्या नागरिकाने सांगितले की, त्याला कुरिअर कंपनीकडून पंजाब बँकेचा इंदिरा नगर शाखेचा १२६८०००१०१६१२४०२ हा अकाऊंट नंबर देण्यात आला. कुरिअरमधून आलेला कॉल हा ९५८२६०४८५० या मोबाईलवरून आला होता, असे या नागरिकाने सांगितले.समज-गैरसमज१) परदेशातून येणारा कोणताही माल हा कस्टम खात्याच्या तपासणीनंतरच दिला जातो. कोणतीही कुरिअर कंपनी अकाऊंटमध्ये पैसे भरण्यास सांगत नाही. कस्टम खात्यातही हे पार्सल सर्वांसमक्ष फोडून आतील मालाचे मूल्यांकन केले जाते आणि त्यानंतर त्यावर कस्टम ड्यूटी आकारली जाते.२) परदेशातून बोलणारी तरूणी ही व्हॉटस्अॅप नंबर हा परदेशी असल्याचे भासवते. परंतु हा व्हॉटस्अॅप नंबर परदेशात कार्यान्वित केला जातो आणि त्याचा वापर मात्र भारतात केला जातो. त्यामुळे या परदेशी नंबरवर अनेकवेळा कॉलही होत नाही.३) तरूणीकडून केलेला व्हिडिओ कॉलही बनावट असतो. हा कॉल रेकॉर्ड करून आपल्या कॉलवेळी मोबाईलसमोर ठेवला जातो. या कॉलही केवळ काही सेकंदाचाच असतो. आपण बिझी असल्याचे सांगून हा फोन कट केला जातो.