गुहागर : शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विरार मनवेलपाडा येथील गुहागर प्रतिष्ठानतर्फे गाड्यांचे निर्जंतुकीकरण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गणेशोत्सवकाळात विरारहून गावाकडे येणाऱ्या राज्य परिवहनच्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम या संस्थेने हाती घेतला आहे.
तंटामुक्त अध्यक्षपदी राजू घाणेकर
खेड : तालुक्यातील हेदली गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजू बळवंत घाणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. घाणेकर सलग ९ वर्षे बिनविरोध अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. २००९ साली त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच राज्य शासनाचा ‘तंटामुक्त गाव’ हा पुरस्कार हेदलीला मिळवून दिला आहे. त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.
झाडांची लागवड
चिपळूण : येथील नगरपरिषदेच्या उद्यान विभागाकडून शहरात यावर्षी १,९०० झाडे लावण्यात येणार आहेत. या कामासाठी सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षीच हा उपक्रम हाती घेण्यात येतो. गतवर्षी कोरोना काळातही सर्वतोपरी काळजी घेत १,७९८ झाडे शहरात लावण्यात आली होती.
रस्त्याची दुरावस्था
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील शिरगाव ते पोफळीदरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. शिरगाव बाजारपेठेतील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. बौद्धवाडीतील ब्रिटिशकालीन पूलही नादुरुस्त झाल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे सध्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. परंतु, हा रस्ताही उखडला आहे.